रेमडेसिविर इंजेक्शनच्या दलालांचा बाजारात उच्छाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST2021-04-25T04:38:58+5:302021-04-25T04:38:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असला तरीही बक्कळ पैसे उकळणाऱ्यांना हे इंजेक्शन लगेच उपलब्ध होतंय. या ...

रेमडेसिविर इंजेक्शनच्या दलालांचा बाजारात उच्छाद!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असला तरीही बक्कळ पैसे उकळणाऱ्यांना हे इंजेक्शन लगेच उपलब्ध होतंय. या इंजेक्शनचा काळाबाजार करण्यासाठी साखळी कार्यरत झाली आहे. यात नावारूपास नसलेल्या आणि नुकतीच वैद्यकीय पदवी संपादन केलेल्या ग्रामीण भागातील तरुण डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.
कोरोना संकटात अनेकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं; पण याच संकटात काहींनी घर भरण्याचा उद्योग सुरू केला आहे. गतवर्षीपेक्षा सध्या लुटालुटीला जोर आला असल्याची परिस्थिती आहे. एकीकडे खासगी रुग्णालयात अनामत रकमेसह डिस्चार्जवेळी बिलाच्या कारणावरून रुग्णांची अडवणूक करण्यात आल्याचा प्रकार वारंवार चव्हाट्यावर येतो. त्यातच आता रेमडेसिविर इंजेक्शनसाठी गरजूंची अक्षरश: पिळवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. आवश्यकतेनुसार जिल्ह्यात इंजेक्शनचा पुरवठा केला जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना रुग्णालयांकडून मात्र इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे सांगून रुग्णांच्या नातेवाइकांनाच इंजेक्शन उपलब्ध करण्यास सांगितले जात आहे. रुग्णालयातून इंजेक्शनची मागणी होताच रुग्णांचे नातेवाईक धावाधाव करतात. इंजेक्शन कुणाकडे मिळेल, याबाबत विचारणा केली जाते. त्यावेळी दलाली करणारे काहीजण अशा गरजूंना गाठून इंजेक्शन देतो, असे सांगतात. मात्र, मूळ किमतीच्या कित्येक पटींनी जास्त पैसे ते उकळतात.
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या या साखळीत पुरवठादार ही पहिली कडी आहे. तर साठेबाज ही दुसरी कडी. त्यानंतर दलालांच्या अनेक कड्या एकमेकात गुंतल्या आहेत. एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा पद्धतीने हे इंजेक्शन जादा पैसे घेऊन गरजुपर्यंत पोहोचविले जाते. या साखळीत प्रत्येक दलालाचा टक्का आहे. तर सर्वात जास्त रक्कम साठेबाज मिळवतायत. त्यातच ग्रामीण भागातील काही तरुण डॉक्टरही या साखळीत असल्याचे समोर येत आहे. या डॉक्टरांच्या मध्यस्थीतून इंजेक्शनची देवाणघेवाण केली जात असल्याचीही चर्चा आहे.
- चौकट
प्रशासनाची पोकळ धमकी
इंजेक्शनचा साठा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तंबी प्रशासनाकडून वारंवार दिली जाते. मात्र, प्रशासनाची ही भूमिका केवळ पोकळ धमकी असल्याचे दिसून येते. रुग्णालयात इंजेक्शनचा तुटवडा असताना बाहेर इंजेक्शन उपलब्ध होतातच कशी, याचा शोध अन्न व औषध प्रशासन का घेत नाही? प्रशासनाने याची चौकशी केल्यास इंजेक्शनचा साठा करून गरजूंची पिळवणूक करणाऱ्या अनेकांचा भांडाफोड होऊ शकतो.
कोट :
रेमडीसिविर इंजेक्शनचा तुटवडा असतानाही प्रत्येक रुग्णाला ते उपलब्ध होतंय हे बाजारातील चित्र अन्न व औषध प्रशासनाला कसं काय दिसत नाही हा प्रश्नच आहे. लुटीच्या या लाटेवर त्यांच्यापैकीही कोणी स्वार आहे का याचीही चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी आणि हा काळाबाजार बंद करावा.
- शशिकांत पवार, वात्सल्य फाउंडेशन