शेतकऱ्यांना दिलासा; जुन्या दराने खत विक्री !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:37 IST2021-05-24T04:37:09+5:302021-05-24T04:37:09+5:30
सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खत दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता होती; पण केंद्राच्या अनुदानाच्या निर्णयानंतर शक्यता कमी झाली आहे. ...

शेतकऱ्यांना दिलासा; जुन्या दराने खत विक्री !
सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खत दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता होती; पण केंद्राच्या अनुदानाच्या निर्णयानंतर शक्यता कमी झाली आहे. त्यातच जिल्ह्यात नवीन खत साठा कुठे तरीच आला असल्याने सध्या तरी जुन्याच दराने विक्री सुरू आहे. त्यातच हंगाम सुरू नसल्याने खतालाही मागणी कमी आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात विविध पिके घेण्यात येतात. खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे साडेतीन लाख हेक्टरहून अधिक असते. यामध्ये बाजरी, भात आणि सोयाबीनचे पीक ५० हजार हेक्टरवर असते. या पिकांसाठी अनेक शेतकरी पेरणीपासून काढणीपर्यंत रासायनिक खतावर खर्च करतात; पण सद्य:स्थितीत खताच्या किमती पोत्यामागे जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्यामुळे एकरी उत्पादन खर्चात वाढ होणार होती. या खत दर वाढीमुळे भात पिकाला एकरी २ तर सोयाबीन आणि घेवडा पिकासाठी १ हजार रुपये खतासाठी अधिक खर्च येणार होता. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार होता. त्यातच जिल्ह्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाशीही सामना करत आले आहेत.
जिल्ह्यात कधी अतिवृष्टी तर काही वेळा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. त्यातच रासायनिक खताच्या किमती वाढल्या होत्या. याविरोधात शेतकरी संघटनांनी आवाज उठवला. शेतकऱ्यांत चिंता तसेच नाराजीचे वातावरण होते. असे असतानाच केंद्र शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रासायनिक खत दरात वाढ होणार नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यातच जिल्ह्यात खताचा नवीन साठा आलेला नाही. त्यामुळे जुने खत आहे त्याच दराने विकले जात आहे. तसेच बहुतांशी विक्रेत्यांना अजूनही कंपन्याकडून दराबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.
.....................................
खरीप हंगाम सर्वसाधारण क्षेत्र ३५००००
चौकट :
खताचे जुने दर खताचे नवीन दर
१०:२६:२६ ११७५ १७७५
१२:३२:१६ १२३५ १८००
२०:२०:२० ९७५ १३५०
डीएपी ११८५ १९००
सुपर फॉस्पेट ३७० १९००
२४:२४:० १३५० १९५०
२०:२०:०:१३ १००० १३५०
.....................................................
सध्याचा दर
१०:२६:२६ ११७५
१२:३२:१६ १२३५
२०:२०:२० ९७५
डीएपी ११८५
सुपर फॉस्पेट ३७०
२४:२४:० १३५०
२०:२०:०:१३ १०००
........................................................
खताला मागणीच नाही...
जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात वळवाचे मोठे पाऊस होतात; पण अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. काही भागात पाऊस झाला असला तरी पेरणीपर्यंत ओल उडून जाणार आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामातील पेरणी करणे शक्य नाही. आता चांगल्या पावसाचीच शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिलेली आहे.
.....
मान्सूनचा पाऊस साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठ-दहा दिवसांत जिल्ह्यात दाखल होतो. यावर्षी मान्सून वेळेत येईल, असा अंदाज आहे; पण शेतकरी अजूनही खत खरेदी करताना दिसून येत नाहीत. ज्या ठिकाणी ऊस लागवड आहे. असेच शेतकरी किरकोळ प्रमाणात रासायनिक खते करत आहेत.
...................................
कृत्रिम टंचाई दूरच...
जिल्ह्यात चांगला पाऊस झाला की खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात होते. सोयाबीन, भात, बाजरी, ज्वारी अशी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. अशावेळी खताची टंचाई जाणवते. मागील वर्षीही टंचाई भासली; पण अजून खताला मागणीच नाही. त्यामुळे कृत्रिम टंचाई दूरच आहे.
..............................
कोट :
आमच्याकडे अजून पाऊस झालेला नाही. त्यामुळे सध्या पेरणी करण्यापूर्वीची मशागतीची कामे करून घेत आहे. एखादा मोठा पाऊस झाला की, बाजरीचे पीक घेणार आहे. पावसानंतरच खताचा विचार करता येईल. आता खताची गरज नाही.
- प्रल्हाद आटपाडकर, शेतकरी
.....................................
पाऊस पडल्यानंतर रासायनिक खते लागतात. कारण, पाऊस झाल्याशिवाय पेरणीचा विचारच करता येत नाही. पावसाला अजून काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे शेतीतील किरकोळ कामे सुरू आहेत. पाऊस झाल्यानंतर खताची खरेदी करणार आहे.
- रामचंद्र पवार, शेतकरी
...................................................................