अधिकाऱ्यांना हाताशी धरून पुनर्वसनाची जमीन लाटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:52+5:302021-08-25T04:43:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरेगाव तालुक्यातील आसरे येथील प्रकल्पग्रस्त समितीचे स्वयंघोषित अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक ...

अधिकाऱ्यांना हाताशी धरून पुनर्वसनाची जमीन लाटली
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरेगाव तालुक्यातील आसरे येथील प्रकल्पग्रस्त समितीचे स्वयंघोषित अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम जगन्नाथ सणस यांनी प्रकल्पग्रस्त म्हणून शासनाची फसवणूक करून बेकायदा जमीन बळकावली आहे. त्यांच्यासह त्यांना या प्रकरणात मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य रुपेश सपकाळ व इतर ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
यासंदर्भात माहिती देताना ग्रामस्थ म्हणाले, तुकाराम जगन्नाथ सणस यांनी प्रकल्पग्रस्त म्हणून बेकायदा मौजे आसरे येथे ज्यादा भूखंड मिळवलेला आहे तसेच कुटुंबातील सरपंचपदाचा गैरवापर करून हा भूखंड ग्रामपंचायत नोंदी मंजूर आदेशपेक्षा दोन हजार चौरस फूट जादा जागेची अशी एकूण चार हजार चौरस फूट जादा जागेची नोंद केली आहे. तसेच गावातील शासकीय सार्वजनिक खुल्या जागा सुमारे ९ लोकांना नोंदणीकृत दस्ताने बेकायदेशीररित्या विक्री केल्या आहेत. हे बेकायदा दस्त रद्द करण्याची नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत जिल्हा मुद्रांक अधिकारी यांना दिनांक २४ मार्च २०१९ रोजी आदेश देण्यात आलेले आहेत तसेच मंजूर आदेशापेक्षा ज्यादा जागेची नोंद कमी करण्याबाबतही गटविकास अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत.
तुकाराम सणस यांनी कुटुंबातील सून व मुलगा यांच्या सरपंचपदाचा गैरवापर करत गावातील खेळासाठी राखीव असलेल्या वीस हजार चौरस फूट शासकीय जागेची नोंद ग्रामपंचायत दप्तरी स्वतः व कुटुंबीय पदाधिकारी असलेल्या नवलाई देवी देवस्थान ट्रस्ट नावे बेकायदा केली आहे. याबाबत देखील धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दावा चालू आहे.
दरम्यान, याबाबत तक्रारी करून देखील प्रशासन तक्रारदारांवरच दबाव टाकत आहे तसेच बेकायदा नोटिसा बजावून आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. याप्रकरणी तुकाराम जगन्नाथ सणस यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यांच्यावर प्रशासनातर्फे गुन्हा दाखल करावा,अशी मागणी यावेळी प्रकल्पग्रस्त लोकांनी केली आहे.
महेंद्र सणस, धर्मेंद्र सणस, रामचंद्र सणस, लक्ष्मण सणस, अनिल सणस यांची यावेळी उपस्थिती होती.