संतापानंतरही संयम...

By Admin | Updated: June 2, 2014 01:19 IST2014-06-02T01:01:34+5:302014-06-02T01:19:04+5:30

आक्षेपार्ह ‘पोस्ट’ : सातार्‍यात कडकडीत बंद; तोडफोड करणार्‍यांवर गुन्हे; पुन्हा ‘गरीबरथ’ टार्गेट

Regrettably after restraint ... | संतापानंतरही संयम...

संतापानंतरही संयम...

 सातारा : राष्ट्रपुरुषांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्रे ‘पोस्ट’ केल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ‘सातारा बंद’मध्ये पुन्हा एकदा एसटीला ‘टार्गेट’ करण्यात आले. शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. दरम्यान, एसटीवर दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले असून, काही जणांना ताब्यातही घेतले आहे. नंतर मात्र सातारकरांनी संयम दाखविला आणि परिस्थिती आटोक्यात आली. राष्ट्रपुरुषांबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक मजकूर आणि छायाचित्रे सोशल मीडियावर ‘पोस्ट’ केल्याच्या घटनेचे पडसाद सातार्‍यात शनिवारी रात्रीपासूनच उमटू लागले होते. पोवई नाका परिसरात शनिवारी रात्री प्रचंड जमाव जमला आणि घोषणाबाजी करतानाच त्यातील काहीजणांनी दगडफेक सुरू केली. रात्री ११.२० ला पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. ‘उद्या सातारा बंद झालाच पाहिजे,’ अशा घोषणा रात्रीच दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार शिवप्रेमी संघटनांनी ‘बंद’चे आवाहन केले होते. रविवारी सकाळपासूनच शहरात तणावपूर्ण शांतता होती. आडभागात काही दुकाने उघडली गेली असली, तरी मुख्य बाजारपेठा बंदच राहिल्या. काही दुकानदारांनी दुकाने उघडली होती; मात्र तरुणांनी दुचाकीवरून ‘बंद’चे आवाहन केल्यावर दुकाने बंद झाली. रुग्णालये, औषध दुकाने आणि अन्य अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ पूर्ण बंद राहिली. दरम्यान, शहराच्या आसपास आणि शहरातही एके ठिकाणी एसटी बसला ‘टार्गेट’ करण्यात आले. करंजे, कॅप्टन शिंदे पोलीस चौकीजवळ आणि राजपथावर या घटना घडल्या. पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तोडफोड करणार्‍यांना वेळोवेळी ताब्यात घेतले. तणावग्रस्त भागात पोलिसांच्या वाहनांनी गस्त घातली. सकाळी साडेअकरापर्यंत तोडफोडीच्या तीन घटना घडल्यानंतर पोलिसांची वाहने बुधवार पेठेतून करंजे, मोळाचा ओढा, आयटीआय, प्रतापगंज पेठ, मोती चौक, राजवाडा या मार्गाने तीन पोलीस वाहनांनी फेरी मारली. संशयास्पदरीत्या रस्त्यात उभ्या असणार्‍या तरुणांना पोलीस हटकत होते. जमाव जमलेला दिसल्यास तो पांगवत होते. त्यामुळे दुपारनंतर अप्रिय घटना घडल्या नाहीत. सकाळी राजपथावर कमानी हौद ते देवी चौकदरम्यान सातारा-आसनगाव या एसटी बसच्या (एमएच १२ सीएच ८६९३) पुढील काचेवर फरशीचा तुकडा भिरकावण्यात आला. तो चुकविण्यासाठी चालक खाली वाकला. चालकाच्या मागे बसलेले तानाजी माने (वय ५०, रा. आसनगाव) यांच्या डोक्यात फरशी लागून ते जखमी झाले. पुणे-कºहाड एसटी बसवर (एमएच १४ बीटी ३१९१) करंजे येथे दगडफेक करण्यात आली. शंकर डिसले हे चालक दगड लागून जखमी झाले. महाबळेश्वर-सातारा एसटी बस डिझेल भरण्यासाठी महामार्गावरील पंपावर गेली होती. तेथून परतताना कॅप्टन शिंदे पोलीस चौकीजवळ या बसवर दगडफेक करण्यात आली. नवनाथ मोहन शेळके हे चालक यात जखमी झाले. दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी एसटी बसना ‘टार्गेट’ केले गेल्यामुळे उन्हाळी सुटी संपत असतानाच गाड्या दोन ते तीन तास उशिरा धावत होत्या. शिवाय, मध्यंतरी पोलिसांच्या सूचनेनुसार दोन तास सातारा बसस्थानकात गाड्या थांबवून धरण्यात आल्या होत्या. त्यामुळे बसस्थानकात प्रचंड गर्दी होती. अनेक प्रवाशांना गावी पोहोचण्यात अडचणी निर्माण झाल्या. (प्रतिनिधी) सोशल मीडियावर अफवांचे पीक सोशल मीडियावर राष्ट्रपुरुषांबाबत बदनामीकारक मजकूर ‘पोस्ट’ झाल्यामुळे विविध ठिकाणी तणाव निर्माण झाला तरी अफवा पसरविण्यासाठी पुन्हा सोशल मीडियाचाच वापर करण्यात येत होता. समाजकंटकांनी अनेक खोट्या बातम्या ‘व्हॉट्स अप’वरून पसरवून तणाव वाढविण्याचा प्रयत्न केला. या बातम्यांची शहानिशा करण्यासाठी ‘लोकमत’ कार्यालयात दिवसभर फोन खणखणत होते. वस्तुस्थिती समजल्यानंतर संबंधित लोक सोशल मीडियाच्या विश्वासार्हतेबद्दल नाराजी व्यक्त करीत होते.

Web Title: Regrettably after restraint ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.