व्रतस्थ ज्ञानयोग्याला रयतेचे अभिवादन
By Admin | Updated: September 22, 2015 23:30 IST2015-09-22T21:53:10+5:302015-09-22T23:30:17+5:30
कर्मवीर जयंती : सातारा शहरातून भव्य शोभायात्रा; विविध विद्यालयांचा सहभाग

व्रतस्थ ज्ञानयोग्याला रयतेचे अभिवादन
सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त सातारा शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कर्मवीर समाधीस अभिवादन करुन सुरू झालेल्या शोभायात्रेत चित्ररथ, कर्मवीरांचे तैलचित्र, देखाव्यासह रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक शाखांचे शिक्षक, सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर अण्णांचे मोठे योगदान आहे. बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली तरच महाराष्ट्राचा विकास होऊ शकेल, हे जाणून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीरांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचा वटवृक्ष आज चांगलाच बहरला आहे. म्हणूनच त्यांच्या कार्यातून ऊर्जा मिळावी,यासाठी दरवर्षी दि. २२ सप्टेंबर रोजी कर्मवीरांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
सातारा शहरातील संस्थेच्या स्थानिक शाखांच्या वतीने आज मंगळवारी सकाळी साडेसात वाजता कर्मवीरांच्या समाधीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, सहसचिव (उच्च शिक्षण) प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, सहसचिव (माध्यमिक शिक्षण) उत्तमराव अवारी, आॅडिटर प्राचार्य शहाजी डोंगरे, कर्मवीर परिवारातील सदस्य, शिक्षक, सेवक, विद्यार्थी यांनी अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटने कर्मवीरांना मानवंदना दिली. त्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. यात स्थानिक शाखांनी कर्मवीरांच्या जीवनकार्यावर आधारित कर्मवीरांचे तैलचित्र रथ सहभागी झाले होते.
संस्थेच्या कर्जत येथील पॅरामिल्ट्री स्कूलचे पथक, सिनिअर-ज्युनिअर एन.सी.सी. पथक, झांज पथक, लेझिम पथक, वाद्यवृंद सहभागी झाले होते. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील की जय, रयत शिक्षण संस्थेचा विजय असो, भारत माता की जय, कर्मवीर भाऊराव पाटील अमर रहे अशा घोषणांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.
शोभायात्रेदरम्यान शहरातील थोर महापुरुषांच्या पुतळ्यांना संस्थेच्या पदाधिकारी, मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. शोभायात्रेदरम्यान शहरातील विविध संस्था, मंडळे, नागरिकांकडून कर्मवीरांच्या प्रतिमेस अभिवादन केले गेले. (प्रतिनिधी)
२८ रोजी राज्यपाल साताऱ्यात
दि रयत सेवक कॉ-आॅप बँकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आणि आर्यांग्ल हॉस्पिटल येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. या निमित्तांनी कर्मवीर जयंतीचा मुख्य कार्यक्रम सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थित होणार आहे.