अपव्यय केल्यास पाणीपुरवठ्यात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST2021-04-05T04:34:50+5:302021-04-05T04:34:50+5:30
सातारा : कास जलाशयामध्ये दोन महिने पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा आहे. गतवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत पाण्याची सद्यपरिस्थिती अत्यंत ...

अपव्यय केल्यास पाणीपुरवठ्यात कपात
सातारा : कास जलाशयामध्ये दोन महिने पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा आहे. गतवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत पाण्याची सद्यपरिस्थिती अत्यंत चांगली असली तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करणे टाळावे, अन्यथा प्रशासनाला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी दिला.
गतवर्षी एप्रिल महिन्यात कासची पाणीपातळी खालावल्यामुळे सातारा शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, कर्मचारी संदीप सावंत, पाटकरी जयराम किर्दत यांनी कास जलाशयाचा पाहणी दौरा करून सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याची माहिती घेतली. गतवर्षी याच दिवशी कास जलाशयामध्ये १०.५० फूट पाणी होते. जलाशयातील पाण्याचा मृतसाठा अधिक असल्यामुळे सातारा शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्याची वेळ पालिकेवर आली होती. सद्यपरिस्थितीत जलाशयात बारा फूट पाणी असून ते दोन महिने पुरेल इतके आहे. १५ जून पर्यंत सातारा शहरात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, अशा पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी एप्रिल महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ निर्माण होणार नाही.
कास जलाशयात मुबलक पाणी असले तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. नळ सुरू ठेवणे, घरगुती वापरासाठी आणलेल्या पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहने असे प्रकार सातत्याने घडत आहेत. ज्या भागात पहाटेच्यावेळी पाणी सोडले जाते त्याठिकाणी दुचाकी, चारचाकी, रिक्षा आदी वाहने नळाच्या, पाईपच्या साह्याने धुतले जातात, अशा पद्धतीने पाण्याचा अपव्यय फार मोठ्या पद्धतीने केला जातो. हा अपव्यय असाच सुरू राहिल्यास नाईलाजास्तव पाणी कपात करण्याची कडक भूमिका प्रशासनाला घ्यावी लागेल, असा इशाराही सभापती हादगे यांनी दिला.
फोटो :
पाणीपुरवठा सभापती सीता राम हादगे, संदीप सावंत, जयराम किर्दत यांनी कास जलाशयातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला.