खाद्यतेल मागणी कमी; दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:39 IST2021-05-10T04:39:18+5:302021-05-10T04:39:18+5:30

सातारा : कोरोना विषाणुमुळे लाॅकडाऊन असल्याने खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दर स्थिर राहिला आहे. मात्र, दुसरीकडे पालेभाज्यांचा ...

Reduced demand for edible oils; Rate fixed | खाद्यतेल मागणी कमी; दर स्थिर

खाद्यतेल मागणी कमी; दर स्थिर

सातारा : कोरोना विषाणुमुळे लाॅकडाऊन असल्याने खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दर स्थिर राहिला आहे. मात्र, दुसरीकडे पालेभाज्यांचा भाव उतरला असून, वाटाण्याचाच फक्त दर वाढला आहे. सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला ८ ते १० हजारांपर्यंत भाव मिळत आहे.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक राहतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यातून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही माल येत असतो. मात्र, कोरोना लाॅकडाऊन असल्याने मागील काही दिवसांत आवक कमी झालेली आहे. सातारा बाजार समितीत रविवारी ६७४ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा १८३, बटाटा १७८, लसूण १२ आणि आल्याची ४ क्विंटल आवक राहिली. आंबा, खरबूज, कलिंगड यांचीही आवक झाली.

सोयाबीन तेल डबा २४००

मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. सध्या लाॅकडाऊन असून, दर स्थिर असला तरी सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहेच. सूर्यफूल तेल डबा २५५० ते २६०० पर्यंत मिळत आहे. शेंगतेल डबा २७०० ते २८००, सोयाबीनचा २४०० रुपयांपर्यंत मिळत आहे, तर पामतेल डबा २१०० रुपयांपर्यंत आहे.

आंब्याची आवक वाढली

सातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, खरबूज आवक होत आहे. रविवारी आंब्याची सर्वाधिक ४२ क्विंटलची आवक झाली, तर कलिंगडाची आवक थोडी झाली.

मिरचीला दर...

सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ८० ते १००, फ्लॉवर १०० ते १५०, दोडका २०० ते २५०, मिरचीला २५० ते ३०० रुपये दर १० किलोला मिळाला. कांद्याला क्विंटलला १२००, लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोट :

कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. मंडई बंद आहेत. त्यामुळे घरासमोर विक्रेते येतात. त्यांच्याकडून खरेदी करतो. दर अधिक असतो. तसेच सर्व भाज्या मिळत नाहीत.

- रामचंद्र काळे, ग्राहक

मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. दरात तेजी असल्याने सोयाबीन तेलाला मागणी आहे. सध्या लाॅकडाऊनमुळे दुकाने बंद आहेत. दर स्थिर राहिले आहेत.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कोरोनामुळे लाॅकडाऊन आहे. त्यामुळे भाज्यांना मागणी कमीच आहे. बाजार समितीतही शेतमालाला दर कमी आहे. काही शेतमाल तर विक्रीअभावी कुजून जाऊ लागलाय.

- प्रकाश पाटील, शेतकरी

Web Title: Reduced demand for edible oils; Rate fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.