पालकमंत्रिपदाचे लाल ‘दिवास्वप्न’

By Admin | Updated: September 18, 2014 23:24 IST2014-09-18T22:41:49+5:302014-09-18T23:24:43+5:30

लगाव बत्ती -

Reddish 'Diva Swapan' | पालकमंत्रिपदाचे लाल ‘दिवास्वप्न’

पालकमंत्रिपदाचे लाल ‘दिवास्वप्न’

दाभोलकरांच्या सातारा जिल्ह्यात भोंदू बुवांची वर्दळ कमी असली तरी राजकीय बुवाबाजीची चलती मात्र जोरात. निवडणुकीच्या तोंडावर दलबदलू आयाराम-गयारामांचा तर धुमाकूळ भलताच. आयुष्यभर जातीयवादावर सडकून टीका करणारे नेते एका रात्रीत भगवा हातात घेतात, तेव्हा त्यांचेच कार्यकर्ते होतात आचंबित. यंदा तर एकमेकांच्या पक्षात प्रवेश करण्याची ही ‘एक्स्चेंज स्कीम’ फुल्ल फॉर्मात पळू लागलीय. चेहरा तोच. आश्वासनं तीच. फक्त चिन्ह बदलून अनेकजण लागलेत जोरदार प्रचाराला .
देशात ‘मोदींची लाट’ टिकून राहिलीय की नाही, माहीत नाही. परंतु जिल्ह्यात मात्र ‘अदलाबदल’ची त्सुनामी लाट उसळलीय. मूळचे शिवसेनेचे दगडू सपकाळ आता काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. ‘आप’ची टोपी उतरवून राजेंद्र चोरगे शिवसेनेत गेलेत. महाबळेश्वरात ‘काँग्रेसचा हात’ सोडून डी. एम. बावळेकर ‘हातात शिवबंधन’ बांधून फिरू लागलेत. खंडाळ्यात सेनेचे पुरुषोत्तम जाधव ‘दादा.. कमळ बघा’ म्हणत इतरांना वाकुल्या दाखवू लागलेत. ‘मनसे’चे रणजित भोसले पुन्हा शिवसैनिक बनलेत. फलटणमध्ये तर रामराजेंचे समर्थक राजेंद्र काकडे चक्क शिवसेनेचे तालुकाप्रमुख बनलेत. बाकीच्या ठिकाणीही परिस्थिती जवळपास तशीच. सर्वांची नावं लिहिता-लिहिता बिचारया पामराची लेखणीही थकून जावी, इतकी !
‘उजडेल तिथं उजडेल’ अशी धाडसी भूमिका घेऊन भाजप-सेनेत प्रवेश केलेल्यांचे चेहरे सातारकरांना माहीत झालेत. मात्र, ‘महायुती’च्या जागावाटपानंतर उघडपणे भगवा झेंडा घेऊन बाहेर पडू इच्छिणाऱ्यांची संंख्या कदाचित यापेक्षाही मोठी. कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटतो, यावर आपल्या उमेदवारीची गणितं बांधणाऱ्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच. विशेष म्हणजे एकच इच्छुक उमेदवार ‘महायुती’तील तीन-चार पक्षांसोबत गुप्तपणे संधान बांधून. त्यामुळं प्रत्येक घटक पक्षाला वाटतंय की, ‘आपल्याकडेच केवळ स्ट्राँग उमेदवार. तेव्हा अमुक-तमुक मतदारसंघ आपल्यालाच हवा!’ कदाचित, या कारणामुळंच ‘महायुती’च्या जागावाटपाचं घोडं अडलंय.
‘काँग्रेस-राष्ट्रवादी’तून बाहेर पडून ‘सेना-भाजप’मध्ये जाणाऱ्या इच्छुकांचं साधं सरळसोट गणित म्हणजे, ‘महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं तर पालकमंत्रिपदावर दावा ठोकायला मातब्बर नेता आहेच कोण? मी निवडून आलो तर थेट मंत्रिमंडळात... अन लाल दिव्यांची गाडी डायरेक्ट माझ्या दारात!’ विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आठही मतदारसंघात अनेकांना आगामी पालकमंत्र्यांचे लाल ‘दिवास्वप्न’ पहाटेच्या वेळी पडू लागलंय. आता बोला!

-सचिन जवळकोटे

Web Title: Reddish 'Diva Swapan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.