कोरोना काळात महसूलची ‘वसूली’; पाच कर्मचारी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:22 IST2021-09-02T05:22:50+5:302021-09-02T05:22:50+5:30

सातारा : कोरोना काळात एकीकडे जनता हैराण झाली असताना, दुसरीकडे मात्र, महसूल विभाग वसुलीत गुंतल्याचे पाहायला मिळाले. वर्षभरात पाच ...

‘Recovery’ of revenue during the Corona period; Five employees trapped | कोरोना काळात महसूलची ‘वसूली’; पाच कर्मचारी जाळ्यात

कोरोना काळात महसूलची ‘वसूली’; पाच कर्मचारी जाळ्यात

सातारा : कोरोना काळात एकीकडे जनता हैराण झाली असताना, दुसरीकडे मात्र, महसूल विभाग वसुलीत गुंतल्याचे पाहायला मिळाले. वर्षभरात पाच कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले, तर छुप्या मार्गाने पोलिसांची हप्ता वसुली सुरूच होती. यामध्ये दोन पोलीस लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत.

जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजविला होता. कोरोनाला निपटण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली होती; तर दुसरीकडे याच यंत्रणेतील काही महाभाग हप्ता वसुलीत गुंतल्याचे लाचलुचपतच्या आकडेवारीवरून पाहायला मिळाले. तसं पाहिलं, तर लाच घेण्यामध्ये पहिल्यापासून पोलिसांचा नंबर पहिला होता. मात्र, आता पोलिसांना मागे सारत महसूल विभाग एक नंबरवर पोहोचला आहे. वर्षभरात महसूल विभागातील तब्बल पाचजण लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कोरोनामध्ये पोलिसांना रात्रंदिवस रस्त्यावर ड्युटी करावी लागल्यामुळे यंदा या खात्यात लाचखोरीचे प्रमाण घटल्याचे दिसून येते. वर्षभरात केवळ दोन पोलीस लाच घेताना सापडले आहेत. अन्यथा एरवी हा आकडा दहाच्या वर जात होता.

चाैकट : दहा हजारांपासून अडीच लाखांपर्यंत लाच

गुन्हा दाखल न करण्यासाठी व नातेवाईकाला जामीन मिळवून देण्यासाठी एका हवालदाराने आठ हजारांची लाच घेतली होती; तर दुसऱ्या एका घटनेत एका अधिकाऱ्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करताना त्यात मदत करण्यासाठी ५० हजारांची मागणी केली होती. सरतेशेवटी २५ हजारांवर तडजोड झाली. त्यावेळी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याला २५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.

तलाठ्यांच्या मदतनीसची लुडबूड

बऱ्याचदा तलाठी कार्यालयात गेल्यानंतर तलाठी बाहेर गेल्याचे सांगितले जाते. त्याठिकाणी असणारा तलाठ्याचा मदतनीसच तलाठ्याचा बडेजाव मारतो. हेच मदतनीस अनेकदा लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले जातात. वर्षभरात महसूल विभागातील पाचजण कर्मचारी सापडले आहेत. यामध्ये तलाठी व खासगी व्यक्तींचाही समावेश आहे.

चाैकट : पालिकेचे आरोग्य निरीक्षकही जाळ्यात

सातारा नगर पालिकेतील तीन आरोग्य निरीक्षकांना तब्बल २ लाख ३० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. अनामत रक्कम परत देण्यासाठी एका ठेकेदाराकडून लाच घेताना हे सर्वजण सापडले होते. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी तीन अधिकारी सापडल्याने खळबळ उडाली होती.

चाैकट : लाच मागितली जात असेल तर येथे संपर्क साधा..

लाच मागितल्यानंतर नेमकी कुठे तक्रार करावी, हे अनेकांना सूचत नाही. यामुळे लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याचे चांगलेच फावते. जर कोणी लाच मागितली, तर जिल्हा न्यायालयासमोरील लाचलुचपतच्या कार्यालयात अथवा ऑनालाईन तक्रार कोणीही नोंदवू शकते. या तक्रारीची लाचलुचपत विभागाकडून तत्काळ दखल घेतली जाते.

समजा एखाद्या अधिकाऱ्याची सर्वत्र ओळख असेल, तर स्थानिक पातळीवरील लाचलुचपत कार्यालयात तक्रार न देता तुम्ही इतर जिल्ह्यांतील लाचलुचपत कार्यालयाशी संपर्क साधूनही तक्रार देऊ शकता.

चाैकट : या वर्षभरात झालेली कारवाई अशी

जानेवारी १

फेब्रुवारी २

मार्च २

एप्रिल १

मे १

जून ४

जुलै १

ऑगस्ट २

Web Title: ‘Recovery’ of revenue during the Corona period; Five employees trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.