प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आर्थिक वर्ष पुर्ण होत असल्याने टाळेबंद जुळविण्याची गडबड जशी आर्थिक संस्थांमध्ये दिसतेय तशीच ती शाळांच्या पातळ्यांवरही दिसू लागली आहे. फी भरू न शकलेल्या पालकांना वर्गशिक्षकांचे फोन येणं सुरू झाले आहे. विशेष म्हणजे फी न भरणाºया विद्यार्थ्यांचे नाव वर्गाच्या ग्रुपवर टाकण्याचेही प्रकार सुरू झाले आहेत.
कोविड काळाने मागच्या वर्षभरात अनेक जणांच्या नोकºया घालवल्या तर काहींची कमाई निम्म्यावर आणली. दैनंदिन आयुष्य सुरळित होत असातनाच दुसºया लाटेची चाहूल लागल्याने कुटूंबाचा खर्च कसा चालवायचा या विवंचनेत पालक असताना शाळेचे येणारे फोन आणि मेसेज त्रासदायक ठरू लागले आहेत. वर्षानुवर्षे पाल्याला शाळेत शिकविल्यानंतर एखाद्या वर्षीच जागतिक संकट म्हणून सोसण्याचं सौजन्यही शाळा व्यवस्थापन दाखवत नाही.
कोरोना हे जागतिक संकट असल्याने याचा फटका सर्वच स्तरांवर बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी परस्परांच्या साथीची गरज आहे. शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य असून ते पार पाडण्यात आपण किती यशस्वी ठरलो याचा उहापोह शाळा व्यवस्थापन करत नाही. मात्र, फी घेणं ही आमची जबाबदारी असल्याचं सांगून ती नेटाने वसुल करण्याचा उद्योग पालकांना त्रासदायक ठरतोय. यातुन पुन्हा एकदा पालक-शाळा संघर्ष वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
चौकट :
फी साठी फोन... अभ्यासाचं काय?
शहरातील बहुतांश शाळांनी आॅनलाईन वर्ग सुरू असून विद्यार्थ्यांनी त्यात सहभागी होण्याचं सुचित केलं. यासाठी पालकांना मोबाईलसह नेटपॅकच्या खर्चाचा कुठंही विचार झाला नाही. फीसाठी वर्गशिक्षकांची ढाल करून शाळा प्रशासन निव्वळ फी वसुलीसाठी उत्सुक असल्याचं चित्र दिसतं. या प्रशासनाच्यावतीने आमचं शिक्षण आपल्या पाल्याला समजतंय का? असा एक मेसेजही पाठविण्याची तसदी न घेणाºया व्यवस्थापनाने वर्गशिक्षकांना मात्र रोजच्या रोज वसुलीचा टास्क सोपवला आहे.
फी शंभर टक्के...पगार साठ टक्के!
फी साठी फोन करणाºया अनेक शिक्षकांना पालकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे. शाळेची शंभर टक्के फी घेतली जाणार, आम्हालाही इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च आहेच की हे टुमणं शाळा व्यवस्थापनाने काढलं. बसचा वापर न करताही विद्यार्थ्यांकडून शंभर टक्के वसुली केलेल्या शाळांनी त्यांच्या शिक्षकांच्या पगारात मात्र कपात केली आहे. नोकरीच्या भितीने कोणीही शिक्षक याविषयी जाहीर वाच्यता करत नाही ही वस्तुस्थिती आहे.
कोट :
मुलांना आॅनलाईनमध्ये काय चाललेय ते समजतेय का? त्यांना काही शंका आहेत का, यापुढील शिक्षणाचे नियोजन काय, पाल्यांना त्यासाठी कसे तयार करावे अशा गोष्टींसाठी फोन गेले असते तर शिक्षकांचे पालकांनी कौतुक केले असते. फीसाठी शिक्षकांनी फोन करणं ही कर्मवीरांच्या जिल्ह्यात शरमेची बाब आहे.
- प्रशांत मोदी, सजग पालक फौंडेशन, सातारा
फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका, असं शासन कितीही ओरडून सांगत असलं तरीही शाळेवर त्याचा कसलाच परिणाम झालेला नाही. पालकांच्या मागे फोनद्वारे आणि ग्रुपवर विद्यार्थ्यांचा अपमान होईल अशा पध्दतीने मेसेज टाकणं मुलांचा मानसिक छळ करण्याचाच भाग असून हे टाळणं आवश्यक आहे.
- निलेश मोरे, पालक, सातारा