वसूल केलेली ७० हजार रुपयांची दंडात्मक रक्कम ग्रामपंचायतीत जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST2021-08-27T04:42:42+5:302021-08-27T04:42:42+5:30
चाफळ : ‘चाफळ पोलिसांनी कोरोनाकाळात दंडात्मक स्वरूपात जमा केलेली ७० हजार तीनशे रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीला देण्यात आली आहे. ही ...

वसूल केलेली ७० हजार रुपयांची दंडात्मक रक्कम ग्रामपंचायतीत जमा
चाफळ : ‘चाफळ पोलिसांनी कोरोनाकाळात दंडात्मक स्वरूपात जमा केलेली ७० हजार तीनशे रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीला देण्यात आली आहे. ही रक्कम चाफळ ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी खर्च करण्यात येईल’, अशी ग्वाही चाफळचे नवनिर्वाचित सरपंच आशिष पवार यांनी दिली.
चाफळसह विभागात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी वेळोवेळी चाफळ पोलिसांनी बंदोबस्त व नाकाबंदी केली होती. या दरम्यान चाफळ दूरक्षेत्राचे ठाणे अंमलदार पोलीस नाईक अमृत आळंदे, सुशांत शिंदे व होमगार्ड यांनी विनामास्क फिरणारे तसेच विनाकारण फिरणारे, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली होती. त्यातून पोलिसांनी ७० हजार ३०० रुपये दंड वसूल केला होता. ही रक्कम पोलीस प्रशासनाने नुकतीच चाफळ ग्रामपंचायतीस सुपूर्द केली.
ही रक्कम चाफळ ग्रामपंचायतीने चाफळ ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व कोरोना अनुषंगाने उपाययोजना करण्याकरिता व तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खर्च करावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी यावेळी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सरपंच आशिष पवार यांनी ही रक्कम ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी खर्च करण्याची हमी दिली.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, सरपंच आशिष दत्ताजीराव पवार, उपसरपंच सुरेश काटे, ग्रामसेवक राजेंद्र चोरगे, चाफळ दूरक्षेत्राचे ठाणे अंमलदार पोलीस नाईक अमृत आळंदे, सुशांत शिंदे व होमगार्ड उपस्थित होते.
फोटो : २६चाफळ
चाफळ येथे कोरोनाकाळात नियमभंग करणाऱ्या ग्रामस्थांकडून दंडात्मक कारवाई करून वसूल केलेली रक्कम ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, सरपंच आशिष पवार, उपसरपंच सुरेश काटे, राजेंद्र चोरगे उपस्थित होते. (छाया : हणमंत यादव)