दुधी भोपळ्याचे विक्रमी उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 00:21 IST2016-03-06T21:18:53+5:302016-03-07T00:21:10+5:30
मातीविना शेतीचा प्रयोग : जालिंदर सोळस्कर यांनी खरबूज, टोमॅटोच्या पिकातून सोळशीच्या माळरानावर घडविला इतिहास

दुधी भोपळ्याचे विक्रमी उत्पादन
कायम दुष्काळी भाग असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सोळशीच्या माळरानात आधुनिक शेतीबरोबरच नवनवीन प्रयोग राबवणारे युवा शेतकरी जालिंदर सोळस्कर जिल्ह्यात मातीविना शेती हा पहिला प्रयोग त्यांच्या शेतात यशस्वी केला आहे. आज दुधीभोपळा, खरबूज, टॉमेटोची ते उत्तम पद्धतीने शेती करत आहेत. सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत त्यांनी २७ ते २८ टन दुधी भोपळ्याचे उत्पन्न घेतले आहे.
सोळशी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जालिंदर सोळस्कर यांना लहानपणापासूनच शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी जेमतेम दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यापेक्षा शेतीविषयक माहिती मिळेल, अशा नोकरीचा मार्ग स्वीकारत त्यांनी कामशेत येथील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी मिळविली.
या कंपनीत त्यांनी जवळपास सहा वर्षे काम केले. तर रायगड येथे दोन वर्षे काम केले. या दोन्ही कंपनीत नोकरी करत असताना त्यांना परदेशातील लोकांच्या शेती तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात केली. ते सध्या नाशिकमधील द्राक्ष बागांचे व रत्नागिरीतील हजारो एकर काजू शेतीचे सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत.
सोळशी येथील वडिलार्जित तीन एकर शेतीत त्यांनी सर्वप्रथम द्राक्षेचा प्रयोग राबविला. त्यांचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. त्यांनी घेतलेल्या द्राक्ष पिकास थायलंडच्या बाजारपेठेतून मागणी आली.
शेती करायला काळी माती लागते. तरच शेती करता येते, ही किमया ही त्यांनी मोडीत काढली. मातीविना शेती हा प्रयोग काही वर्षांपूर्वीच आपल्या शेतात यशस्वी केला. शेती वाचविण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. असणारे संपूर्ण क्षेत्र जरी ठिबक सिंचनखाली असले तरी पाण्याविना शेतीव्यवस्था कोलमडून जाण्याचा मोठा धोका आगामी काळात या भागातील शेतकऱ्यांना जाणवणार आहे.
द्राक्ष, ढोबळी मिरची, अगोरा वांग, चायनीज भाज्या यासारख्या विविध पिके त्यांनी आपल्या शेतात घेऊन ती यशस्वी केली आहेत. आज ३० गुंठे क्षेत्रात त्यांनी मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनचा वापर करून दुधी भोपळ्याचे पीक घेतले आहे. --संजय कदम
उत्तम शेती व्यवस्थापनासाठी शिक्षणाची आवश्यकता नाही. आपण बाह्य जगाचा अभ्यास करणे गरजेचे आहे, अनुभवातून मिळालेले ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असते, असा माझा विश्वास आहे. तरुणपिढीने नोकरीच्या मागे न लागता असणारी शेती काळानरूप करावी. सध्या शेती मालाच्या दराबाबत बाजारपेठेत भिन्न परिस्थिती आहे. टॉमेटोसारखे पीक दर नसल्याने शेतकरी रस्त्यावर ओतून देत आहेत. मात्र माझ्या बागेतून दररोज १ टन टॉमेटो ९ ते १० रुपये किलोप्रमाणे विकली जात आहेत.
- जालिंदर सोळस्कर