रेकॉर्डब्रेक... ६६ हजार चालकांना दीड कोटी दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:45 IST2021-09-17T04:45:45+5:302021-09-17T04:45:45+5:30

कऱ्हाड : वाहतुकीचे नियम आणि त्याअनुषंगाने असणारे कायदे बहुतांश वाहनधारकांना माहिती असतात; पण तरीही नियमभंग करणाऱ्यांची संख्या कमी नाही. ...

Record break ... 66,000 drivers fined Rs 1.5 crore! | रेकॉर्डब्रेक... ६६ हजार चालकांना दीड कोटी दंड!

रेकॉर्डब्रेक... ६६ हजार चालकांना दीड कोटी दंड!

कऱ्हाड : वाहतुकीचे नियम आणि त्याअनुषंगाने असणारे कायदे बहुतांश वाहनधारकांना माहिती असतात; पण तरीही नियमभंग करणाऱ्यांची संख्या कमी नाही. गत आठ महिन्यांत कऱ्हाडच्या वाहतूक शाखेने अशाच पद्धतीने नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यातून ‘रेकॉर्डब्रेक’ दीड कोटी दंड वसूल केला आहे.

कऱ्हाडच्या वाहतूक शाखेने जानेवारी ते ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत वाहतुकीच्या वेगवेगळ्या कलमांखाली तब्बल ६६ हजार वाहनांवर कारवाई केली आहे. या एकूण वाहनांपैकी दुचाकींवर झालेल्या कारवाईचे प्रमाण साठ ते सत्तर टक्के असून, त्यातही ‘ट्रीपल सीट’प्रकरणी कारवाई केलेल्या दुचाकींची संख्या १ हजार ९५६ आहे. आठ महिन्यांचा विचार करता फक्त कऱ्हाड शहरात दिवसाकाठी सरासरी नऊ दुचाकींवर ‘ट्रीपल सीट’मुळे दंडात्मक कारवाई होते.

‘ट्रीपल सीट’पेक्षाही ‘नो पार्किंग’मध्ये वाहन लावणाऱ्यांचे प्रमाण कऱ्हाडात जास्त दिसून येते. शहरात सम-विषम पार्किंग व्यवस्था आहे. दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा या मार्गावर सम-विषम तारखेनुसार पार्किंग केले जाते. इतर अंतर्गत रस्त्यांवर पार्किंगला काही प्रमाणात सूट आहे. मात्र, एवढे असूनही गत आठ महिन्यात ‘नो पार्किंग’मध्ये वाहन पार्क केल्यामुळे नऊ हजारांवर चालकांना तब्बल २० लाखांचा दंड करण्यात आला आहे.

- चौकट

‘ट्रीपल सीट’ने अपघाताला निमंत्रण

दुचाकीवरून होणारा ‘ट्रीपल सीट’ प्रवास अनेक कारणांनी धोकादायक ठरतो. ‘ट्रीपल सीट’ प्रवास करताना चालकाचा ताबा सुटण्याची किंवा तोल जाण्याची शक्यता जास्त असते. रस्त्यावर अचानक अडथळा आल्यास वेगावर नियंत्रण मिळविणे चालकाला शक्य होत नाही. काहीवेळा दुचाकी अचानक नादुरुस्त होण्याची शक्यताही असते.

- चौकट

‘अल्टरवर’ही पोलिसांची नजर

दुचाकीचा सायलेन्सर ‘अल्टर’ करणाऱ्यांचे प्रमाणही सध्या वाढले आहे. सध्या अशा ‘अल्टर’वाल्यांवरही पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. संबंधित वाहनांचा अहवाल उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पाठविला जात असून प्रत्येकी सात हजारपेक्षा जास्त दंड होत आहे.

- कोट

वाहतूक नियमांचे पालन व्हावे, यासाठी चालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. मात्र, तरीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. काही प्रकरणे न्यायालयातही पाठविण्यात आली आहेत.

- सरोजिनी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक

- चौकट

आठ महिन्यांतील कारवाई

नियमभंग : कारवाई: दंड

लायसन्स नसणे : १४५९ : ७,२९,५०० रु.

मोबाईल वापर : १४२० : २,८४,००० रु.

ट्रीपल सीट : १९५६ : ३,९१,२०० रु.

नो पार्किंग : ९८२८ : १९,६५,६०० रु.

नंबर प्लेट : २३७२ : ४,७४,४०० रु.

हेल्मेट नसणे : ४७८ : २,३९,००० रु.

लेन कटिंग : ११५०१ : २३,००,२०० रु.

फ्रंट सीट : ५६७ : १,१३,४०० रु.

इतर केसेस : ३६७८९ : ७७,३५,१०० रु.

- चौकट (फोटो : १६केआरडी०२)

कारवाईची सरासरी

इतर : ३५ टक्के

विनाहेल्मेट : ८ टक्के

प्रवासी वाहतूक : १० टक्के

ट्रीपल सीट : २१ टक्के

नो पार्किंग : २६ टक्के

- चौकट

‘रेकॉर्डब्रेक’ दंडात्मक कारवाई

६६,३७० : एकूण कारवाई

१,४२,३२,४०० रु.: एकूण दंड

- चौकट

वाहतूक शाखेचा लेखाजोखा

१ : सहायक निरीक्षक

१ : उपनिरीक्षक

३९ : कर्मचारी

१९ : वाहतूक पॉइंट

१ : क्रेन

१ : जीप

फोटो : १६केआरडी०३

कॅप्शन : प्रतीकात्मक

Web Title: Record break ... 66,000 drivers fined Rs 1.5 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.