वाचकांनी वाचनाचा चिकित्सकपणे अभ्यास करावा : किरण माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:54+5:302021-02-05T09:17:54+5:30
सातारा : ‘लेखक लिहितो ते सत्य असतेच असे नाही. तेव्हा वाचकांनी वाचनाचा चिकित्सकपणे अभ्यास करावा,’ असे मत कॉ. किरण ...

वाचकांनी वाचनाचा चिकित्सकपणे अभ्यास करावा : किरण माने
सातारा : ‘लेखक लिहितो ते सत्य असतेच असे नाही. तेव्हा वाचकांनी वाचनाचा चिकित्सकपणे अभ्यास करावा,’ असे मत कॉ. किरण माने यांनी व्यक्त केले.
येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयातर्फे श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध ग्रंथालय पुरस्कारांचे वितरण नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये कॉ. किरण माने यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक डॉ. रवींद्र भारती-झुटिंग, अध्यक्ष शशिभूषण जाधव, कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र माने हे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. रवींद्र भारती म्हणाले, ‘अश्वमेध ग्रंथालय वाचनसंस्कृती जोपासताना ग्रंथाला आणि ग्रंथालयांना विविध पुरस्कार देण्याचे काम करत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांत आणि समाजात प्रबोधन करण्याचे काम करत आहे.’
पुरस्काराविषयी भूमिका मांडताना कार्याध्यक्ष साहित्यिक डॉ. राजेंद्र माने म्हणाले, ‘पुरस्कार ही ग्रंथ चळवळीच्या कार्यकर्त्याच्या पाठीवरची थाप आहे. पण हा थांबा नव्हे. या पुरस्कारापासून प्रेरणा घेऊन पुढे कार्यरत व्हायचे आहे. ग्रंथांनी माणूस समृद्ध आणि प्रगल्भ होत असतो. ग्रंथालये ग्रंथ वाचकांच्या हाती सोपविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्यांना गौरविण्याचे अश्वमेध ग्रंथालय काम करत आहे.’
शिवानी भारती-झुटिंग हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर शशीभूषण जाधव यांनी आभार व्यक्त केले. यावेळी अरुण माने, स्वाती राऊत, डी. टी. थोरात यांनी पुरस्काराला उत्तर म्हणून मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रा. श्रीधर साळुंखे, नाना कदम, राजाराम राक्षे, प्रदीप कांबळे, केदार खैर, सादिक खान, मदन देशपांडे, संजय साबळे, गौरव इमडे, नीलेश पवार, गौतम भोसले, गोरखनाथ पाटील व ग्रंथप्रेमी उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथील अश्वमेध ग्रंथालयाच्यावतीने उत्कृष्ट ग्रंथालयांना पुरस्कार वितरित करण्यात आले.