रत्नपारखीच्या ‘फिरकी’ने कऱ्हाड पालिकेत गलबला!
By Admin | Updated: March 4, 2016 00:57 IST2016-03-03T22:50:21+5:302016-03-04T00:57:32+5:30
‘टेन्शन’मुक्तीसाठी घ्या म्हणे खडा : पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचेही ‘कानावर हात‘

रत्नपारखीच्या ‘फिरकी’ने कऱ्हाड पालिकेत गलबला!
प्रमोद सुकरे -- कऱ्हाड येथील पालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने ‘मेहरबान’ बदलत्या राजकीय समीकरणाला त्रासलेत तर अधिकारी ‘मार्च एंड’च्या वसुलीला. पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे बेरजेच्या राजकारणाचा ‘शनी’ तर अधिकाऱ्यांमागे वसुलीची ‘साडेसाती’च सुरू आहे. नागरिकांच्या मनात थकबाकीदार म्हणून फ्लेक्सवर नाव झळकण्याची भीती अन् वेळेत पैसे भरले नाहीत तर पालिकेचा ‘बँडबाजा’ दारात येण्याची धास्ती, अशा स्थितीत गुरुवारी एक रत्नपारखी पालिकेत आला अन् ‘वाह... इथे नांदते ‘लोकशाही’, असे म्हणत निघून गेला. गुरुवारी दुपारी एकची वेळ. कऱ्हाड पालिकेच्या आवारात नागरिकांची मोठी वर्दळ. एवढ्यात राशी भविष्याप्रमाणे खडे विकणारा एक रत्नपारखी पालिकेत पोहोचला. गर्दीतल्या अनेक त्रस्त चेहऱ्याकडे पाहून ‘तुमची रास कोणती ते सांगा? आणि मग तुम्ही अमुकतमुक खड्याची अंगठी वापरा, तुम्हाला त्याचा फायदा होईल,’ असे तो सांगू लागला; पण त्याचं ऐकून कोण घेतो? सगळेचजण त्रासलेले. फ्लेक्सवर थकबाकीदार म्हणून नाव लागेल की काय याची भीती अन् पैसे भरले नाहीत तर बँडबाजा दारात वाजण्याची धास्ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. मग त्या रत्नपारखीने पाचू, लसण्या, पवळा, नीलम, मोती, गोमेद, पुष्कराज, माणिक या रत्नांची नावं घ्यायला सुरुवात केली. कोणता खडा वापरल्यावर काय फायदा होतो, हेसुद्धा पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याकडे कुणी लक्ष देईना. एवढ्यात त्या रत्नपारखीचं लक्ष पालिकेच्या तळमल्यावर असणाऱ्या एका कक्षाकडे गेले. तेथे लोकांची गर्दी झाल्याने तोही तेथे पोहोचला. अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन त्यांना ‘तुमची रास कोणती?,’ असे विचारणार तोच त्याला त्यांच्या टेबलावर पैशाची ‘रास’ दिसली. तिथं संकलित करवसुली सुरू होती. रत्नपारख्यालाच एकानं ‘काय पाहिजे?, असं विचारलं. ‘तुमचे किती पैसे भरायचे आहेत?,’ असा प्रश्नही विचारला. त्यावर त्यानं ‘मी रत्न विकायला आलोय,’ असं सांगताच एकजण उपरोधिकपणे म्हणाला, ‘वसुली चांगली होण्यासाठी कोणतं रत्न वापरायला पाहिजे? तर दुसऱ्याने आमच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून त्यांना मोत्याची अंगठी घालायचा सल्ला दे म्हणजे ते जरा शांत होतील,’ असे सांगितले. बिचारा रत्नपारखी पायऱ्या चढून पहिल्या मजल्यावर पोहोचला तर मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला कडी. त्यानं ‘साहेब कधी येणार?,’ अशी विचारणा केली. पालिकेच्या कर्मचाऱ्यानं काम विचारलं अन् खड्याचा विषय समजताच त्या कर्मचाऱ्यानं नगरसेवकांच्या कक्षाकडे बोट दाखवलं. ‘मुख्याधिकाऱ्यांपेक्षा सत्ताधारी आणि विरोधी मेहरबानांच्या कक्षात जावा, त्यांना खरी तुमच्या खड्याची गरज आहे; कारण सहा महिन्यांनंतर तेच निवडणुकीला ‘खडे’ राहणार आहेत,’ असे सुचविले. हे ऐकताच रत्नपारखी सत्ताधारी मेहरबानांच्या कक्षाकडे वळला. वाटेत एका सभापतींच्या कक्षात एक ‘ज्येष्ठ दादा’ नगरसेवक बसले होते. त्यांनाही खरंतर निवडणुकीत ‘जयवंत’ व्हायचंच आहे; पण का कोणास ठाऊक त्यांनी रत्नपारख्याकडे दुर्लक्ष केले. बेल वाजवली. शिपाई आला अन् रत्नपारखीला बाजूला न्यायला सांगितलं. मग तो नगराध्यक्षांच्या कक्षात पोहोचला. तेथे अनेक नगरसेविका होत्या. त्यांनाही या रत्नपारख्यानं पुष्कराज, हिरा, माणिक आदींची माहिती सांगायला सुरुवात केली; पण ‘आमच्या ‘ह्यांना’ विचारल्याशिवाय पालिकेत आम्ही कोणतीच गोष्ट करीत नाही,’ असे सांगितले. त्यानंतर त्यानं सत्ताधारी गटाच्या सभासद हॉलमध्ये डोकावून पाहिले; मात्र काका उपनगराध्यक्ष झाल्यापासून इथ शुकशुकाट असतो, असं एकानं त्याला सांगितलं. मग शेजारीच असणाऱ्या उपनगराध्यक्षांच्या दालनात तो पोहोचला. तेथे अनेक मेहरबान तळ ठोकूनच बसलेले. काही अधिकारी उभे राहून कामांची माहिती देत होते. एवढ्यात हा रत्नपारखी तेथे मध्येच घुसला. ‘मी भविष्य पाहून त्याप्रमाणे रत्ने किंवा खड्याची अंगठी देतो,’ असं त्यानं आवर्जून सांगितलं; पण अनेकांनी टाळले. अशातच पाठीमागून काकांनी एक शिपाई पाठवून दिला. त्याने रत्नपारख्याला निरोप दिला. ‘मी इथल्या लोकशाही आघाडीचा अध्यक्ष आहे. तेव्हा मी सांगितल्याशिवाय इथल्या कोणालाही रत्न अथवा खडा द्यायचा नाही.’ मग काय ‘वाह... इथे नांदते ‘लोकशाही’, असे म्हणत रत्नपारखी निघून गेला. विरोधी नगरसेवक मात्र बराचवेळ त्याची वाट पाहत बसले होते.