जांभुळवाडीत आढळले दुर्मिळ खवल्या मांजर
By Admin | Updated: October 10, 2014 23:03 IST2014-10-10T22:03:34+5:302014-10-10T23:03:41+5:30
सुरक्षितरीत्या जंगल परिसरात सोडले

जांभुळवाडीत आढळले दुर्मिळ खवल्या मांजर
तळमावले : जांभुळवाडी-कुंभारगाव, ता़ पाटण येथील काही युवकांना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास दुर्मिळ खवल्या मांजर आढळून आले. संबंधित मांजर वनविभागाने ताब्यात घेऊन सुरक्षितरीत्या जंगल परिसरात सोडले.जांभुळवाडी येथील राजेंद्र किसन मोरे, प्रवीण रामचंद्र मोरे, अक्षय ईश्वर मोरे या युवकांना घराशेजारील अंधारात प्राणी असल्याचे जाणवले़ त्या युवकांनी बॅटरीच्या साह्याने पहिले असता, तो प्राणी खवल्या मांजर असल्याचे त्यांना दिसले. युवकांनी त्याला पकडून ढेबेवाडी वनविभागाला याबाबत माहिती दिली.
त्यानंतर वनक्षेत्रपाल सतीश साळी, वनपाल सुनील कोळी, वनरक्षक डी़ डी़ बोडके, अमर पन्हाळे, बंडू माने, सचिन पाटील घटनास्थळी दाखल झाले़ या युवकांनी खवल्या मांजर वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर वनविभागाकडून ते जंगलात सोडून देण्यात आले़ यावेळी नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश निवडुंगे, राजेंद्र मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़ (वार्ताहर)