कास पठारावरील दुर्मीळ फुलांचा सूर्यास्त!
By Admin | Updated: October 24, 2016 00:37 IST2016-10-24T00:37:14+5:302016-10-24T00:37:14+5:30
मंगळवारनंतर शुल्क आकारणी बंद : कुमुदिनी तलावातील फुले पाहण्याची संधी उपलब्ध

कास पठारावरील दुर्मीळ फुलांचा सूर्यास्त!
पेट्री (सातारा) : साताऱ्याच्या पश्चिमेस असलेल्या कास पठारावर देश विदेशातून हजारो पर्यटकांनी आत्तापर्यंत भेट दिली. शाळा-महाविद्यालयांच्या सहलींतून भावी पिढीने पठारावरील फुलांच्या विश्वाची सहल केली. पठारावर वीस ते पंचवीस टक्के फुले दिसत आहेत. कास पठारावरील फुलांच्या हंगामाचा सूर्यास्त झाला असून, मंगळवार, दि. २५ आॅक्टोबरपासून शुल्क आकारणे बंद करण्यात येणार आहे.
कास-महाबळेश्वर मार्गावर तीन किलोमीटर अंतरावर पांढऱ्या शुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागले आहे. या कुमुदिनी फुलांचा हंगाम साधारण दहा ते पंधरा दिवस राहणार आहे. जिल्ह्यातील कास पठार हे आंतरराष्ट्रीय जैवविविधता तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणून सातासमुद्रापार विविधरंगी दुर्मीळ फुलांच्या गालिच्यासाठी परिचित आहे. पठारावरील हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पठारावर पर्यटक तसेच शाळा महाविद्यालयीन तरुणाईची गर्दी होताना दिसते. दरम्यान, येथील वनसंपत्ती पाहता अभ्यासू वृत्ती जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहली येत आहेत. परंतु सध्या फुलांचा हंगाम ओसरत चालल्याने गर्दी तुरळक दिसू लागली आहे.
दरम्यान, पठारावर पर्यटकांची सतत रेलचेल असून, पठारावरील जैवविविधता पाहता कास पठाराची ख्याती जगभर पसरलेली आहे. लांब-लांबून पर्यटक दाखल होत आहेत. (वार्ताहर)
दिवाळीत
कमळ पाहायला यायचं
४दिवाळीपूर्वी फुलांचा हंगाम ओसरला जात असून, कुमुदिनी तलावातील कमळे दिवाळीच्या सुटीत विना शुल्क पाहता येणार आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा फुलांचा हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी तो काही दिवस पुढे वाढला आहे.
४तुरळक फुलांभोवती गवत अधिक वाढल्याने सापांपासून सावध राहावे. पायवाटा व्यतिरिक्त इतरत्र पर्यटकांनी जाऊ नये. जेणेकरून सध्या शिल्लक असणारी फुले पायदळी तुडवले जाणार नाहीत.
४तसेच दि. २५ आॅक्टोबरनंतर शुल्क आकारणी बंद केली तरी फुलांच्या संरक्षणासाठी काही वन समितीचे कर्मचारी पठारावर राहणार आहेत, अशी माहिती संयुक्त वनव्यवस्थापन समितीने ‘लोकमत’ला दिली.