चाळकेवाडीत दुर्मिळ गरूड...
By Admin | Updated: August 9, 2015 21:04 IST2015-08-09T21:04:14+5:302015-08-09T21:04:14+5:30
वनविभागाच्या ताब्यात : पायाच्या जखमेवर उपचार

चाळकेवाडीत दुर्मिळ गरूड...
ढेबेवाडी : चाळकेवाडी-कुंभारगाव, ता. पाटण येथील शिवारात अरुंद बोटांचा सर्पमार गरूड हा दुर्मिळ पक्षी ग्रामस्थांना सापडला. ग्रामस्थांनी हा पक्षी ढेबेवाडी वनविभागाच्या ताब्यात दिला आहे. येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार करून त्याची प्रकृती तंदुरुस्त असल्याचा अहवाल दिला आहे.याबाबत ढेबेवाडी वनविभागाने दिलेली माहिती अशी की, वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चाळकेवाडी येथील शिवारात काही ग्रामस्थांना दुर्मिळ पक्षी जखमी अवस्थेत सापडला. त्यांनी तो वनकर्मचारी बाबासाहेब पाटील यांच्या ताब्यात दिला. वनविभागाने तातडीने त्याच्यावर उपचार केले. त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली होती. उपचारानंतर हा पक्षी तंदुरुस्त झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पक्षीमित्र डॉ. सुधीर कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पक्षी जंगलात सापडतो. अत्यंत दुर्मिळ असलेल्या या पक्ष्याचे ‘शॉर्ट स्रेक ईगल’ असे इंग्रजी तर मराठीमध्ये त्याला अरुंद बोटांचा सर्पमार गरुड या नावाने ओळखले जाते.या गरुडाचीची उंची दीड फूट असून, रंग करडा-तपकिरी पांढरा असा आहे. डोळे पिवळ्या रंगाचे असून, त्याचे कार्यक्षेत्र सुमारे वीस किलोमीटर एवढे असते. तो घिरट्या घालून साप, सरडे, सरपटणारे प्राणी यांच्यावर उदरनिर्वाह करतो. चाळकेवाडी-कुंभारगाव परिसरात सापडलेल्या या गरुडाला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. (वार्ताहर)
दुर्मिळ प्राणी, पक्ष्यांचा वावर...
कुंभारगाव परिसर हा डोंगरी विभागात येतो. त्यामुळे या परिसरात झाडांचे प्रमाणही जास्त आहे. कधी-कधी या परिसरात अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी, कीटकांचे ग्रामस्थांना दर्शन होते. मात्र, संबंधित प्राणी, पक्षी अथवा कीटकाबद्दल शास्त्रीय माहिती नसल्याने त्यांना त्याच्याबद्दल योग्य माहिती देता येत नाही. रंग व आकार एवढेच वर्णन ग्रामस्थांकडून केले जाते. त्यावरून तो प्राणी, पक्षी कोणता हे ओळखणे पर्यावरणप्रेमींना अवघड होते. या परिसराचा पर्यावरणप्रेमींना अभ्यास करणे गरजेचे आहे.
चाळकेवाडीत आढळलेला सर्पमार गरूड हा पक्षी अत्यंत दुर्मिळ आहे. भक्ष्याच्या शोधात कदाचित तो खाली आला असावा. एखाद्या फासळीत किंवा तारेमध्ये अडकून त्याच्या पायाला जखम झाली असावी. या पक्ष्यांची जपणूक होणे गरजेचे आहे.
- सुधीर कुंभार, पक्षीतज्ज्ञ, कऱ्हाड