अपहरण करून बलात्कार; आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी

By Admin | Updated: May 20, 2015 00:16 IST2015-05-19T22:30:00+5:302015-05-20T00:16:04+5:30

गतीने तपास, जलद निकाल

Rape by kidnapping; Ten years imprisonment for the accused | अपहरण करून बलात्कार; आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी

अपहरण करून बलात्कार; आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी

सातारा : पाचवड पुलाजवळून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन शामगाव घाटाच्या पायथ्याशी तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सातारा न्यायालयाने टॅक्सीचालकाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि बारा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मुलीच्या वडिलांना फसवून गाडीतून उतरवून आरोपीने मुलीचे अपहरण केल्याचेही न्यायालयात सिद्ध झाले.
रवींद्र बाजीराव धनवडे (वय ३२, रा. धोम, ता. वाई) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. दि. ३० जून २०१४ ला रात्री सातारा येथील १६ वर्षांची एक मुलगी वडिलांसोबत मुंबईला जायला निघाली होती. त्यांना उशिरापर्यंत एसटी बस मिळाली नाही. त्यावेळी धनवडे याने त्यांना भेटून ‘मी तुम्हाला पाचवड फाट्यावर सोडतो आणि पुढे मुंबईपर्यंत जाण्याची व्यवस्था करतो,’ असे सांगून दोघांना आपल्या जीपमध्ये बसविले. त्याच्यासह तिघेचजण गाडीत होते. आनेवाडी टोलनाका ओलांडल्यावर पाचवड पुलाजवळ त्याने मुलीच्या वडिलांना सांगितले, ‘मागील दरवाजा नीट लागलेला नाही, तो लावून घ्या.’मुलीचे वडील दरवाजा लावण्यासाठी खाली उतरताच धनवडेने भरधाव वेगात गाडी पुढे नेली. मुलीला सुरीचा धाक दाखवून पट्टीने मारहाण केली. त्यानंतर शामगाव घाटाच्या पायथ्याशी नेऊन जीपमध्येच तिच्यावर अमानुष अत्याचार केला. मुलीला तिथेच सोडून धनवडे निघूनही गेला. जितेंद्र त्रिंबक मांढरे या टेम्पोचालकास ही मुलगी रस्त्यात असहाय अवस्थेत दिसल्याने त्याने तिला घरी आणले.दरम्यान, मुलीच्या तपासासाठी पोलिसांनी पथके नियुक्त केली होती. त्यातील एक पथक मांढरे यांच्याकडून मुलीस घेऊन पोलीस ठाण्यात आले आणि तिचा जाबजबाब नोंदवून घेतला.
दोनच दिवसांत आरोपी निष्पन्न होऊन पुरावेही ताब्यात आले. मुलीच्या वैद्यकीय तपासणीत आरोपीचे धागेदोरे मिळून आले. तसेच घटनेदिवशी रात्री साडेअकरा वाजता जीपने टोलनाका ओलांडल्याचे चित्रण तेथील सीसीटीव्हीत मिळाले.
पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. प्राथमिक तपास भुर्इंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केला. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. जहीरअब्बास डी. मुल्ला यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. कोसमकर यांनी आरोपीला अत्याचार, बाललैंगिक अत्याचारविरोधी कायदा तसेच अपहरणाच्या गुन्ह्यात दोषी मानले.

गतीने तपास, जलद निकाल
या घटनेचा तपास आणि खटला केवळ अकरा महिन्यांत पूर्ण होऊन निकाल लागला. या खटल्यात एकंदर वीस साक्षीदारांना तपासण्यात आले. त्यातील एकही फितूर झाला नाही.
दोन साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. पंच म्हणून प्रथमच उज्ज्वला कांबळे या महिला साक्षीदाराने साक्ष दिली, तर टोलनाक्यावरील कर्मचारी निकेतन किशोर पिसाळ याने आरोपीला टोलनाक्यावर, ओळख परेडच्यावेळी आणि न्यायालयातही ओळखले.


विविध कलमाखाली सुनावलेल्या शिक्षा आरोपीस एकाचवेळी भोगायच्या असल्याने दहा वर्षांची सक्तमजुरी आणि बारा हजार रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा धनवडेला भोगायची आहे. प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे हवालदार अविनाश पवार, आयूब खान, सुनील जाधव, नंदा झांजुर्णे यांनी सरकारी पक्षाला साह्य केले.

Web Title: Rape by kidnapping; Ten years imprisonment for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.