सह्याद्रीच्या डोंगररांगामधील रानमेवा यंदा लांबला...
By Admin | Updated: April 7, 2015 01:17 IST2015-04-07T00:07:09+5:302015-04-07T01:17:29+5:30
अवकाळी पाऊस : गारपीट व बदलत्या हवामानाचा परिणाम

सह्याद्रीच्या डोंगररांगामधील रानमेवा यंदा लांबला...
लक्ष्मण गोरे -बामणोली -सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील डोंगररांगामध्ये पाटण, सातारा, जावळी व महाबळेश्वर तालुक्यांच्या पश्चिम घाटमाथ्यावर दरवर्षी, तोरणे आंबुळगी, करवंदे, जांभळे, आळू, फणस, आंबा हा डोंगरातील रानमेवा दरवर्षी मार्च महिन्यापासून मे-जून पर्यंत हा रानमेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो; परंतु चालूवर्षी अनेकवेळा झालेला अवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम या रानातील फळपिकांवर झाला आहे. यामुळे रानमेवा विकून पोटापाण्याचा प्रश्न भागविणारे अनेक गरीब शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांत वेलीवर झुडपात येणारी ‘आंबुळगी’ ही फळे पिकण्यास सुरुवात होते. या फळानंतर तोरणे, जांभळे, आळू, करवंदे, फणस व आंबे या पिकांचा क्रमाने हंगाम सुरू होतो. परंतू सध्या एप्रिल महिन्याचा एक सप्ताह संपला तेव्हा आता ‘आंबुळगी’ पिकण्यास सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाने अनेक फळांचा मोहोर व फुले गळून गेल्याने गतवर्षीच्या तुलनेत ही सर्व फळे कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.
‘तोरणे’ हे काटेरी झुडपाला येणारे एक बीज फळही अजून पिकण्यास सुरुवात झाली नाही. हे फळ पांढऱ्या रंगाचे चवीला गोड व साधारण तुरट असे असते. फळाचा आकार लहान मण्यांएवढा असते. याचप्रमाणे करवंदे व जांभळे या पिकांचीही अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी कच्ची करवंदे व जांभळे तयार झाली आहेत. तर अनेक करवंदी या काटेरी झुडपांना व जांभळांच्या झाडांना मोहोर आला आहे. यामुळे यावर्षी सुमारे एक ते दोन महिने या फळांचा हंगाम उशिराने सुरू होणार आहे.
यंदा उशिराने सुरू होणाऱ्या ‘रानमेव्या’मुळे अनेक गरीब शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पाटण तालुक्याच्या कोयनानगर, हेळवाक व नवजा तसेच सातारा तालुक्यातील ठोसेघर, परळी भाग जावळी तालुक्याचा कास-बामणोली विभाग व महाबळेश्वर तालुक्याचा तापोळा, प्रतापगड या विभागातील हजारो शेतकरी आंबुळगी, तोरणे, करवंदे यांच्या पाट्या भरून डोक्यावरून सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत विकतात व पावसाळ्यासाठीचा बाजारहाट खरेदी करतात. अनेक गरीब शेतकरी कुटुंबे यातून हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल करत असतात; परंतु सध्या फक्त आंबुळगी या फळांचा हंगाम सुरू झाला आहे. आणि फळे कमी प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
रानमेवा तयार होऊन पिकण्याचा हंगाम
दरवर्षी फेबु्रवारी महिन्यात ‘आंबुळगी’ हे एकबीज फळ वेलीवर पिकून तयार होते. याचा हंगाम महिनाभर चालतो. कास पठार परिसर उंचावर हे फळ मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. या फळानंतर ‘तोरणे’ हे एकबीज पांढरे फळ मार्च महिन्यात काटेरी झुडपाला येते हे. तुरट व चवीने गोड फळ आहे. यानंतर जांभळे, करवंदे, आंबे, आळू ही पिके लागोपाठ एप्रिल-मे महिन्यांत तयार होतात.
मागीलवर्षी फेबु्रवारी महिन्यात आम्ही बारा दिवस आंबुळगी व मार्च महिन्यात १६ दिवस तोरणे पाटीभरून नेऊन सातारला विक्री केली होती; परंतु यावर्षी अजून तोरणे पिकण्यास सुरुवातही नाही. आंबुळगी गेल्या आठवड्यापासून पिकण्यास आताच सुरुवात झाली आहे. तसेच यावर्षी फळेही कमी असल्याने जमा करण्यास व विकण्यासही वेळ होत आहे. यामुळे आम्हाला दुसरा व्यवसाय व मोलमजुरी करावी लागत आहे.
-शंकर साळुंखे,
शेतकरी, भोंबवली, ता. सातारा