रंगून गेलाय वर्ग.. ‘झेडपी’चं सुटलंय वारं!
By Admin | Updated: June 10, 2016 00:13 IST2016-06-09T22:52:45+5:302016-06-10T00:13:29+5:30
शाळा प्रवेशाची तयारी जय्यत : लोकप्रिय ‘सैराट झालं जी...’ गाण्याच्या चालीवर जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमाची जिंगल ट्यून सोशलमीडियावर लोकमत विशेष

रंगून गेलाय वर्ग.. ‘झेडपी’चं सुटलंय वारं!
सातारा : जिल्हा परिषदेच्या शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. पंधरा दिवस शिल्लक असले तरी मुलांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. याच काळात जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती देणारी ‘जिंगल ट्यून’ व्हॉट्सअॅप सोशल मीडियावर फिरत आहे. ‘सैराट झालं जी...’ गाण्यांच्या चालीवरील ही ट्यून पालकांना आकर्षित करत आहे.शहरांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांपुढे स्पर्धा आहे. खासगी शाळा पुरवत असलेल्या सुविधा, आकर्षक इमारती यामुळे प्राथमिक शाळांसमोर मोठी स्पर्धा असली तरी ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे अनेक शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांची चिंता दिसत नाही.शहरी भागांच्या लगत असलेल्या गावांतील मुलं खासगी शाळांमध्ये जातात. या मुलांच्या सोयीसाठी अनेक शाळा ‘स्कूल बस’ पाठवत आहेत. त्यामुळे त्या भागातील शाळांमधील शिक्षकांसाठी मुलांना शाळेपर्यंत आणण्यासाठी धडपड करावी लागते. शाळा प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जिल्हा परिषदेकडून मार्गदर्शक कृती कार्यक्रम ठरवून दिलेला आहे. अनेक शाळा व शिक्षक केवळ त्याचीच अंमलबजावणी करत असतात. त्यानुसार दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात गावामध्ये सर्व्हे केला जातो. त्यातून सहा ते सात वयोगटातील मुलांचा शोध घेतला जातो.
ही यादी केंद्र प्रमुखांमार्फत पंचायत समिती, जिल्हा परिषदेला दिली जाते. सहा वर्षांवरील मुलांच्या पालकांना शाळेत प्रवेश घेण्याबाबत सांगितले जाते. त्यातून एखादा विद्यार्थी आलाच नाही तर त्याचा पाठपुरावा घेऊन तो कोठे गेला आहे. कोणत्या शाळेत प्रवेश घेतला याची माहिती जिल्हा परिषदेला द्यावी लागते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या सूचना केल्या जात असल्या तरी अनेक हौसी शिक्षक नवनवीन उपक्रम राबवत असतात. कोणी मुलांना गुलाबपुष्प देतात, कोण खाऊ देतात तर काहीजण त्यांची गावातून मिरवणूक काढून औक्षण करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ करतात.
विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांकडे आकर्षित करण्यासाठी एका निर्मिती संस्थेने जिंगल ट्यून तयार केली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून ही ट्यून बाहेर पडली अन् असंख्य शिक्षक, पालकांपर्यंत ती पोहोचत आहे. ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय असली तरी ‘सैराट झालं जी...’ हे गाणं लहान मुलांपासून सर्वांच्याच ओठांवर खेळत आहे. हाच धागा पकडून ही ट्यून बनविण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळा वापरत असलेला ज्ञान रचना वाद, वस्तू-वस्तू जोडून गणित शिकवणं, मुलांना विशेष आवड निर्माण करण्यासाठी वर्गांची केली जात असलेली रंगरंगोटी आदी उपक्रमांची ओळख या ट्यूनच्या माध्यमातून करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
डिजिटल झेडपी गुरुजी
ज्ञानदानाचे काम करत असलेल्या शिक्षकांचा ‘डिजिटल झेडपी गुरुजी ग्रुप व्हॉट्सअॅपवर सक्रिय आहे. या गु्रपमधील असंख्य सदस्य हे तंत्रज्ञानाविषयी रुची बाळगून आहेत. स्मार्टफोनमध्ये नवनव्याने होत असलेले बदल, त्यामुळे होत असलेल्या गमतीजमती याद्वारे शेअर करत आहेत. त्यामुळे सर्वच गुरुजींमध्ये याविषयी आवड निर्माण होत आहे.
ज्ञान रचनावाद आलं, वर्ग हे रंगून गेलं...
वस्तू मोजून-मोजून, क्रियेत दंगून गेलं
जिल्हा परिषद, ज्याच्या त्याच्या तोंडी
हो... ई-लर्निंगचं वारं आलं जी, सैराट झालं जी...
बदलून गेलंय सारं, झेडपीचं सुटलंय वारं,
रचनेचं विचार आलं, प्रगत शिक्षण झालं,
हो... शाळेमधी गुणवत्ता आली,
हो... हातामध्ये पॅन आलं जी...
सैराट झालं जी..!