छेड काढणाऱ्याला रणरागिणींचा चोप
By Admin | Updated: January 21, 2015 23:55 IST2015-01-21T23:08:54+5:302015-01-21T23:55:37+5:30
टपरीचालक आक्रमक : देगाव येथील प्रकार

छेड काढणाऱ्याला रणरागिणींचा चोप
सातारा : देगाव, ता. सातारा येथे एका मद्यपीने छेड काढण्याचा प्रकार झाल्यानंतर एका टपरी चालक महिलेने त्याला बेदम चोप दिला. औद्योगिक वसाहतीतील कृष्णा वेर्इंगच्या समोर हा प्रकार मंगळवारी रात्री घडला. औद्योगिक वसाहतीत टपरी व्यावसायिक आहेत. या परिसरात संध्याकाळनंतर मद्यपींचा वावर वाढतो. त्यामुळे अन्य टपरीचालक या मद्यपींना लांब हाकलण्याचा प्रयत्न करतात. संबंधित महिलेच्या टपरीसमोरच्या रस्त्यावर हा मद्यपी उभा राहिला होता. त्याने अंधारात उभे राहून या महिलेकडे बघून अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली. ही बाब लक्षात आल्यानंतर तिने तिच्या अन्य सहव्यावसायिकांना याची माहिती दिली. व्यावसायिकांनी त्याला तिथून दूर पिटाळले.त्यानंतर पुन्हा अर्धा तासाने तो पुन्हा त्याच ठिकाणी येऊन अश्लील चाळे करू लागला. त्यावर संबंधित महिलेने काही महिलांच्या मदतीने त्याला बेदम चोप दिला. थोड्या वेळाने काही व्यावसायिकांनी मध्यस्थी करून या महिलांना शांत केले. त्यानंतर संबंधिताच्या घरी संपर्क साधून त्याच्या कारनाम्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. कुटुंबीयांनी विनंती केल्यानंतर हे प्रकरण पोलिसांत न जाता परस्परच मिटले. (प्रतिनिधी)