रामराजे,पवारांकडून सभापतिपदाचा अवमान !

By Admin | Updated: April 8, 2015 00:32 IST2015-04-07T23:35:09+5:302015-04-08T00:32:24+5:30

उदयनराजे : जिल्हा बँंकेसाठी अर्ज दाखल करताना दोन्ही नेत्यांवर ओढले कोरडे

Ramraje, Pawar's resignation contempt of the chairmanship! | रामराजे,पवारांकडून सभापतिपदाचा अवमान !

रामराजे,पवारांकडून सभापतिपदाचा अवमान !

सातारा : ‘अनेक वर्षे डबक्यात राहिलेल्या बेडकाला समुद्रात पोहण्याची संधी मिळाली तरी त्या बेडकाला डबकंच आवडतं. त्याप्रमाणं रामराजेंचे झाले आहे. ते राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती असतानाही त्यांना त्या पदाचे संकेत नीट समजलेले नाहीत. त्यांनी हे संकेत पायदळी तुडवून माझ्यावर खालच्या पातळीवर जावून टीका केली. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही रामराजेंना पोरकट ठरवले आहे. या दोघांनीही विधानपरिषद सभापतीपदाचा अवमान केला आहे,’ अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात केली. दरम्यान, यावेळी त्यांनी समर्थकांसोबत गृहनिर्माण व डेअरी मतदारसंघातून प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांसोबत जिल्हा बँकेतील निवडणूक कार्यालयात येऊन आपला निवडणूक अर्ज दाखल केला. त्याआधी त्यांनी बँकेमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी कवठेमहांकाळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात रामराजे व उदयनराजे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचा पोरकटपणा बंद करावा, असा सल्ला दिला होता. याबाबत उदयनराजेंना पत्रकारांनी छेडले असता उदयनराजे म्हणाले, ‘राज्याच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतीपदाचा मान सातारा जिल्ह्याला मिळाल्याने मला आनंद झाला. मात्र, सभापती झाल्यावर रामरावांनी जी विधाने केली त्यावरुन शरद पवारांची ही निवड चुकली, असंच खेदानं म्हणावं लागतंय. जिथं पोक्त व ज्ञानी लोक बसलेले असतात, त्या सभागृहाचे सभापतीपद भूषविणाऱ्या व्यक्तिकडून त्या पदाचे संकेत पाळण्याची अपेक्षा असते. पण रामरावांनी माझ्यावर व आमच्या घराण्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब असून शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा.’
सुरुवातीला अजित पवारांचा सल्ला हा रामराजेंना होता, असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले; परंतु पत्रकारांनी हा सल्ला देताना पवारांनी तुमचेही नाव घेतले होते, हे निदर्शनास आणून दिल्यानंतर उदयनराजे म्हणाले, ‘अजित पवार हे माझ्या अत्यंत जवळचे आहेत. आमच्या राजकीय मतभेद असू शकतात. मात्र, अजित पवार हे खालच्या सभागृहाचे म्हणजे विधानसभेचे सदस्य आहेत. तर रामराजे वरच्या सभागृहाचे ‘मानकरी’ आहेत. अत्यंत ज्ञानी अशा सभागृहाच्या सभापतीला पोरकट म्हणून अजित पवारांनी या पदाचा अवमान केला आहे. मला काही कायदेतज्ञांनी सांगितलं की या गोष्टीचा निषेध व्हायला हवा. मात्र, याचा निषेध संबंधित सभागृहाच्या सदस्यांनी करायला हवा होता.’ असं म्हणत उदयनराजेंनी एकाचवेळी रामराजे आणि अजित पवार या दोघांवरही निशाणा साधला. (प्रतिनिधी)


मला पोरकटपणाची उपमा देणाऱ्या अजित पवारांनी तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नये. मीही उत्तर देऊ शकतो. मात्र, आधीच ते जास्त दु:खात आहेत. मी कुठल्या आमदाराला मुस्काटात दिली नाही. शिव्या दिल्या नाहीत. याआधी मी खूप सहन केलंय. जशास-तसं उत्तर दिलं असतं, तर माझ्या विरोधात बोलणारे फोफावले नसते.
- खासदार उदयनराजे भोसले


प्रश्न तडीस नेणार...‘ते’ अडचणीत येणार!
सातारा : ‘जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला तर मी काय चूक केली सांगा? अनेक वर्षे काही भ्रष्ट लोकांमुळे इरिगेशनची कामे रखडली. माधव चितळे समितीच्या अहवालामध्ये भ्रष्टाचारामुळे जलसंपदा खातंच बंद करावं लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी मी कुठलीही तडजोड करणार नाही, माझ्या मुद्द्यापासून मी बाजूला झालेलो नाही. त्यामुळे हे मुद्दे मी तडीस नेणार...भ्रष्टाचारी मंडळी अडचणीत येणार,’ असा सज्जड इशारा पुन्हा एकदा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी पत्रकार परिषदेत आपली मते व्यक्त केली. उदयनराजे म्हणाले, ‘जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या बैठकीला प्रोटोकॉलनुसार खासदार या नात्याने मला बोलावणे आवश्यक होते. मात्र रामराजेंच्या काळात एकदाही हा प्रोटोकॉल पाळण्यात आलेला नाही. आम्हाला काहीच पत्ता लागत नसेल तर १८ लाख मतदारांच्या प्रश्नांना मी कसा सामोरा जाणार. आज सर्वकाही शेतीवर अवलंबून आहे. मात्र, शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेती पिकाला कोणतेही संरक्षण नाही. या दृष्टिने कोणीही विचार करायला तयार नाही. कुठल्याही कारखान्याच्या भानगडीत मी नसतो. फलटणच्या पाणीप्रश्नाबाबत जाब विचारायला गेलो तर त्यांनी मलाच श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीत ओढून घेतले. कृष्णा खोऱ्यातच सोडून रामराजेंनी कारखान्यातही मोठा भ्रष्टाचार केला आहे, हे लक्षात आले.’
जिल्हा बँकेतील राजकारणाबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘काही मूठभर प्रवृत्ती बँकेत आहेत त्यामुळे बँकेत राजकारण आणलं जातंय. गैरव्यवहारांमुळे इतर जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकांची जशी अवस्था झाली, तशी अवस्था सातारा जिल्हा बँकेची होऊ देणार नाही. ही बँक राजकारणविरहित लोकहिताकरिता चालवली पाहिजे.’
‘ब्राझील, जपान मध्ये गेल्या ५0 वर्षांपासून इर्मा योजना राबविली जाते. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकाला विमा संरक्षण दिले जात असल्याने या देशांत शेतकऱ्यांना सन्मान राखला जात आहे. तोच सन्मान भारतातील शेतकऱ्यांनाही मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. (प्रतिनिधी)

राष्ट्रवादीची २२ एप्रिलला मुंबईत बैठक
साातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पॅनेल निश्चितीसाठी मुंबईत २२ एप्रिल रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले मुंबईला जाणार का?, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
उदयनराजे बुधवारी दोन अर्ज दाखल करणार असून यापैकी एका अर्जावर बााळासाहेब पाटलांचे बंधू सूचक म्हणून सही करणार आहेत. अशी माहिती उदयनराजेंनी दिली

Web Title: Ramraje, Pawar's resignation contempt of the chairmanship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.