दरड कोसळून पसरणी घाट ठप्प!

By Admin | Updated: August 8, 2014 00:33 IST2014-08-08T00:29:01+5:302014-08-08T00:33:34+5:30

महाकाय दगड कोसळला : तीन तासांनंतर वाहतूक सुरळीत

Rampage jam | दरड कोसळून पसरणी घाट ठप्प!

दरड कोसळून पसरणी घाट ठप्प!

पाचगणी/बावधन : पाचगणी-वाई घाटातील दांडेघर गावाजवळ दरड कोसळून एक महाकाय दगड रस्त्यावर आल्याने दोन्हीकडील वाहतूक आज, गुरुवारी दुपारी ठप्प झाली. यावेळी दोन्ही बाजूंना अडकलेल्या रुग्णवाहिकांमधील रुग्णांची अदलाबदल करून त्यांना रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले.
जिल्ह्यातील पसरणी, केळघर, आंबेनळी, बोरणे घाटांत दरड कोसळण्याचे सत्र पंधरा दिवसांपासून सुरूच आहे. पसरणी घाटात आज पडलेला दगड सुमारे वीस फूट उंचीचा होता. एवढी मोठी दरड पसरणी घाटात कधीच पडली नव्हती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पाचगणी-वाई घाटात दांडेघर गावापासून सुमारे एक किलोमीटरवर डोंगराच्या बाजूला असणारी दरड दुपारी सव्वातीनच्या सुमारास पूर्ण रस्त्यात कोसळली. यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला.
पाचगणीहून वाईकडे जाणाऱ्या एसटी गाड्या पुन्हा माघारी फिरवून पाचगणी-पाचवडमार्गे मार्गस्थ केल्या, परंतु वाईहून पाचगणीकडे येणारी सर्व वाहने वाहतूक ठप्प झाल्याने जाग्यावरच थांबून राहिली.
काही वेळाने नागरिकांनी एका बाजूने रस्ता मोकळा केल्याने केवळ दुचाकी वाहनेच जाऊ लागली. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही दरड बाजूला काढण्यासाठी दोन जेसीबी व एका ब्रेकरच्या साह्याने काम सुरू केले. वाहतूक ठप्प झाल्याने पाचगणीहून वाईकडे जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची एसटीअभावी गैरसोय झाली होती. सायंकाळी सहानंतर एका बाजूने वाहतूक सुरू झाली. जड वाहने मात्र रात्री उशिरापर्यंत अडकून पडली होती. (वार्ताहर)

Web Title: Rampage jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.