रामराजे सांगणार त्याच्याच गळ्यात पडणार माळ
By Admin | Updated: September 11, 2014 23:12 IST2014-09-11T22:06:42+5:302014-09-11T23:12:39+5:30
फलटण तालुका : नवख्या उमेदवारांमुळे ‘पतिराज’ येण्याची कर्मचाऱ्यांना भीती

रामराजे सांगणार त्याच्याच गळ्यात पडणार माळ
नसीर शिकलगार -फलटण -फलटण पंचायत समितीवर गेली २० वर्षे राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांची सत्ता आहे. त्यामुळे रामराजे सांगतील त्याच महिलेच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार आहे.
पंचायत समितीमध्ये १४ पैकी १२ राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन जण काँग्रेसचे सदस्य आहेत. काँग्रेसचे दोन्ही सदस्य खुल्या प्रवर्गातील असल्याने विरोधी पक्षाकडून कोणी इच्छुक असण्याचा प्रश्नच येत नाही. सभापतिपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी कोळकी पंचायत समिती गणातील सुनंदा शिंदे, बरड गणातील स्मिता शिंदे, आसू गणातील वैशाली गावडे या तिघीजणी प्रमुख उमेदवार आहेत.
निवडून आलेल्या तिघीही पहिल्यांदाच निवडून आल्याने त्यांना अनुभवाची कमी असणार आहे. त्यामुळे महिला सभापतींच्या पतीचा हस्तक्षेप वाढण्याची भीती कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे. सभापतिपदासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. रामराजेंनीही अद्याप याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याची उत्सुकता वाढू लागलेली आहे.