रक्षा विसर्जन टाळून केली जाते वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:36 IST2021-01-03T04:36:42+5:302021-01-03T04:36:42+5:30
पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील नाटोशी हे गाव जवळपास सात हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावातील काही तरुण गावात कोणाचेही ...

रक्षा विसर्जन टाळून केली जाते वृक्ष लागवड
पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील नाटोशी हे गाव जवळपास सात हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावातील काही तरुण गावात कोणाचेही निधन झाले की त्या कुटुंबातील व्यक्तीची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करीत त्यांना रक्षा विसर्जनावेळी रक्षा पाण्यात न टाकता एका वृक्षाची लागवड करून रक्षा त्या वृक्षाच्या मुळाशी टाकण्याबाबत जागृती करतात. त्यांच्या या जागृतीला यशही येत आहे. नाटोशी येथे गत दोन महिन्यांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले तर त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. मात्र, गावातील युवक त्या कुटुंबाला आधार देत संबंधित व्यक्तीच्या स्मरणार्थ त्या कुटुंबाला एक फळझाड देऊन त्याची लागवड करण्याची विनंती करतात. तसेच त्या रोपाची लागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारीही त्या कुटुंबावर दिली जाते. रक्षा विसर्जनावेळी रक्षा पाण्यात न टाकता त्या झाडाच्या मुळाशी टाकण्याचे आवाहन केले जाते. त्याला नाटोशीतील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सहकार्य करीत आहेत.
नाटोशी येथील या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. येथे राबवित असलेल्या उपक्रमाचा आदर्श मोरणा विभागातील सर्वच गावांनी घ्यावा, असे आवाहन नाटोशीतील युवक करीत आहेत. या उपक्रमामुळे वृक्ष लागवड आणि संवर्धन होणार आहे. त्याबरोबरच रक्षा पाण्यात न टाकल्याने पाण्याचे प्रदूषण थांबण्यास मदत होईल.
फोटो : ०२केआरडी०२
कॅप्शन : नाटोशी, ता. पाटण येथे कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर नातेवाईक वृक्ष लागवड करून संबंधिताच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न करतात.