राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञानाचे जनक : जगदाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST2021-05-23T04:38:31+5:302021-05-23T04:38:31+5:30
मसूर : ‘भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाचे खरे जनक दिवंगत राजीव गांधी आहेत. भारत बलशाली, स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच भारताला ...

राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञानाचे जनक : जगदाळे
मसूर : ‘भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाचे खरे जनक दिवंगत राजीव गांधी आहेत. भारत बलशाली, स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी राजीव गांधी यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे यांनी केले.
मसूर येथे दिवंगत राजीव गांधी यांचा स्मृतिदिन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
जगदाळे म्हणाले, ‘द्वेषाचे राजकारण देश एकसंध बांधू शकत नाही. त्यासाठी राजकारण विसरून समाजकारण करा, असा विधायक सल्ला देणारे तसेच आधुनिकतेची कास धरून भारताला प्रगतिपथावर चालण्याची प्रेरणा देणारे दिवंगत राजीव गांधी यांच्यामुळे संगणक व दूरसंचार क्षेत्रात भारताचे नाव अग्रस्थानी पोहोचले. शेतकरी, कामगार सबल झाला पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते. अहिंसेचे पालन हे हिंसेपेक्षा कितीतरी धाडसाचे असते हे त्यांचे म्हणणे होते. स्थानिक स्वराज्य संस्थांना जास्तीचा निधी मिळून त्यांचे सबलीकरण व्हावे यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील होते.’
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिग्विजयसिंह जगदाळे, सावळाराम कांबळे, माजी उपसरपंच शांताराम मोरे, गणेश मोरे, शकील शेख, काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. सावळाराम कांबळे यांनी प्रास्ताविक केले.