दांडियासाठी राजस्थानी पेहरावाची आस!
By Admin | Updated: October 13, 2015 23:44 IST2015-10-13T20:43:38+5:302015-10-13T23:44:44+5:30
बदलता नवरात्रोत्सव : स्पर्धेत टिकण्यासाठी युवतींची ‘थ्री-फोर्थ’ घागऱ्याला वाढती पसंती

दांडियासाठी राजस्थानी पेहरावाची आस!
सातारा : आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून शहरात ठिकठिकाणी रोषणाईची झगमगाट दिसून येत आहे. यामध्ये तरुण, तरुणीची देखील ‘डिस्को दांडियाच्या’ तयारीसाठी मोठी धावपळ सुरू झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या दांडिया उत्सवाला अधिक खास करण्यासाठी राजस्थानी पेहरावाला मागणी वाढत असून यंदा नव्याने आलेल्या थ्री-फोर्थ घागऱ्याला युवतींची मागणी वाढत आहे.गणेशोत्सवानंतर लगेचच नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. घटस्थापनेच्या अगदी पहिल्या दिवसापासून दांडियाला सुरुवात होत असल्याने शहरातील डेपरी दुकानांमध्ये राजस्थानी पेहराव घेण्यासाठी गर्दी दिसून येत होती. पूर्वीचा रास गरबा, दांडियाला धार्मिक स्वरूप होते. त्यामुळे दांडिया मंदिरातून मैदानात आला व त्यात झालेले बदलही लोकांनी उत्साहाने स्वीकारले व त्यातूनच सध्या ‘डिस्को दांडियाच’ं स्वरुप निर्माण झालं. मूळचा राजस्थानी हा खेळ असला तरी आज संपूर्ण भारतभर उत्सवाच्या स्वरुपात खेळला जात असून साताऱ्यातही हा दांडिया मोठ्या प्रमाणात खेळला जाऊ लागला आहे.दांडियाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी त्याच्या पोशाखाकडे खास करून पाहिले जात आहे. त्यामुळे राजस्थानी पोशाख या दिवसात भाडेतत्त्वावर मिळण्यास सुरुवात झाली सुरुवातीला याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही परंतु अलीकडील वर्षामध्ये दांडियासाठी या ड्रेसला मागणी वाढली असून चालू वर्षी ही मागणी २५ टक्के वाढली असल्याचे ड्रेपरी दुकानदारकांनी सांगितले.
त्यामुळे सातारकरांनीही दांडियासाठी राजस्थानी पेहरावा स्विकारला असल्याचे बाजारपेठेत पहायला मिळत आहे.
यंदा शहरातील ड्रेपरी दुकानामध्ये प्रथमच थ्री फोर्थ घागरा आला असून याला मागणीही वाढली असून त्याचबरोबर चनी पा चोली मॅचिंग ग्लोसी, झुमके, कंबर पट्टा, बाजूबंद, बांगड्या, पैंजण, कवडीचे पूर्ण ज्वेलरी सेट अशी विविध स्वरूपातील ड्रेपरी मुलींसाठी आली आहेत.तर मुलांसाठी केडीया, धोतर, पगडी, गळ्यातला कडा, पाय व हातातील कडे, कानातील बाली व कमरेची ओढणी आली आहे. मुलंही खुप हौेसेने हे पेहराव नोंदवायला येत आहेत.
साधारणत: पेहराव्याला दिवसाला २०० रुपयांपासून १००० रुपये पर्यंत भाडे असून ड्रेपरी मिळण्यासाठी युवकयुवतींची धडपड सुरू आहे. (प्रतिनिधी)
यंदाच्या दांडियासाठी गत वर्षीच्या तुलनेने राजस्थानी पेहराव्यामध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दांडियासाठी खास करून राजस्थानी पेहरावा घेण्यासाठी मागील १५ दिवसांपासूनच ग्राहकांनी बुकिंग करून ठेवले असून, यामध्ये सर्वंच समाजातील लोकांनी मागणी केली आहे.
- सुमीत साठे, दुकानदार
राजस्थानचा घागरा बाजारात...
दांडियासाठी खासकरून दांडीयाला स्पर्धेसाठी राजस्थानी ड्रेपरीला मागणी होती परंतु सध्या डिस्को दांडियालाही या पेहरावाला वाढती मागणी पाहून यंदा प्रथमच थ्री फोर्थ घागरा बाजारात राजस्थानहून आला आहे. त्याला मोठी मागणी असल्याने यंदा दांडियात थ्री फोर्थ घागरा झळकणार हे नक्की.