‘लावणी शो’ला टाळ्यांचा पाऊस
By Admin | Updated: February 9, 2015 00:48 IST2015-02-08T21:35:29+5:302015-02-09T00:48:24+5:30
फलटण : ठेका धरायला लावणाऱ्या अस्सल मराठमोळी गाण्यांना दाद

‘लावणी शो’ला टाळ्यांचा पाऊस
फलटण : ठेका धरायला लावणारी अस्सल मराठमोळी गाणी... शिट्ट्या अन् टाळ्यांचा पडणारा पाऊस... हे चित्र होते फलटणमधील लावणी कार्यक्रमाचे. वारंवार होणारी ‘वन्समोअर’ची मागणी. यामध्ये लावणी नृत्यांगणा चैत्रालीराजे यांचा लावणीचा कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडला.‘लोकमत सखी मंच’च्या फलटण येथील यावर्षीच्या पहिल्याच कार्यक्रमाची धडाकेबाज सुरुवात महिलांना आवडणाऱ्या लावणीच्या कार्यक्रमाने करण्यात आली. त्यातच चैत्रालीराजेची लावणी म्हटल्यावर सखींनी येथील राजलक्ष्मी लॉन तुडुंब भरून गेले होते. विक्रमी संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर फलटणच्या नगराध्यक्षा सारिका जाधव, स्वराज उद्योग समूहाच्या कार्यकारी संचालिका अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, पंचायत समितीचे उपसभापती पुष्पा सस्ते, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या विमल साळुंखे-पाटील, सखी साडी सेंटरच्या रेखा बोळे, सोनाज ब्युटी पार्लरच्या मनीषा फलके, लक्ष्मी वुमन्स ब्युटीपार्लरच्या इरावती मुळीक, हॉटेल विसावाचे प्रभाकर पाटील, हॉटेल रघुनंदनचे सुरेश पोतेकर, शीला जगताप आदी उपस्थित होते.
लावणीच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘तूच सुखकर्ता...’ या गाण्याने गणेशाला वंदन करून करण्यात आली. त्यानंतर अस्सल लावण्यांची बरसात सुरू झाली. ‘या रावजी, बसा भावजी...’, ‘जरा खाजवा की...’, ‘कारभारी दमानं...’, ‘नाद खुळा...’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल...’ आदी गाण्यांनी सखींना ठेका धरायला लावला. ठेकेबाज गाण्यांना व नृत्यांना सखींनी उत्स्फूर्त साथ दिली.
काही सखींनी रुमाल हवेत भिरकावले, काहीनी शिट्ट्या वाजवल्या तर काहीनी टाळ्यांच्या गजर करत दाद दिली. काही सखींनी जागेवर तर काहीनी व्यासपीठावर जाऊन ठेका धरला. चैत्रालीराजेच्या प्रत्येक अदाकरीला उत्स्फूर्त दाद मिळाली.
त्यांना दर्शना, पल्लवी, मोना, सिमरन, स्वाती, सोनाली या नृत्यांगणांनी साथ दिली.
ढोलकीवर बाळासाहेब हिरगुडे, संदीप पवार, विशाल मोहिते, की बोर्डची साथ प्रकाश पवार यांनी दिली. सुनीता गायकवाड यांनी गायन केले. अभिजित राजेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)