पश्चिम भागात पाऊस वाढू लागला; महाबळेश्वरला ४२ मिलिमीटरची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:45 IST2021-08-20T04:45:24+5:302021-08-20T04:45:24+5:30

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवस तुरळक पाऊस होत होता. मात्र, बुधवारपासून जोर वाढू लागला आहे. गुरुवारी ...

The rains began to increase in the western part; Mahabaleshwar recorded 42 mm | पश्चिम भागात पाऊस वाढू लागला; महाबळेश्वरला ४२ मिलिमीटरची नोंद

पश्चिम भागात पाऊस वाढू लागला; महाबळेश्वरला ४२ मिलिमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवस तुरळक पाऊस होत होता. मात्र, बुधवारपासून जोर वाढू लागला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर कोयना धरणात ९२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार आठवड्यांपूर्वी धो-धो पाऊस कोसळत होता. अवघ्या तीन दिवसांत पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोलीसह इतर भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रस्ते तुटले होते, पूल वाहून गेलेले. त्यामुळे अनेक गावेही संपर्कहीन झालेली. तर या अतिवृष्टीत शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच पश्चिम भागातील पावसामुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयना धरणात तर विक्रमी पाणीसाठा झाला होता. कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यांसारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. असे असतानाच तीन आठवड्यांपासून पश्चिम भागात तुरळक पाऊस होत होता. यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली होती. परिणामी कोयनावगळता इतर धरणांतील विसर्ग बंद करण्यात आलेला. पण, दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा वाढू लागला आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ११ मिलिमीटर पाऊस झाला. नवजा येथे २६ आणि महाबळेश्वरला सकाळपर्यंत ४२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जूनपासून कोयनेला ३५१८, नवजा ४५४८ आणि महाबळेश्वर येथे ४७३० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास २१०० क्युसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच होता. धरणात ९२.५९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.

चौकट :

प्रमुख धरणांत ८० टक्क्यांवर पाणीसाठा...

जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडी, धोम आणि बलकवडी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणांची साठवण क्षमता १४६ टीएमसीवर आहे. सध्या पाऊस कमी असला तरी सर्वच धरणांत ८० टक्क्यांच्या वर पाणीसाठा झालेला आहे. कोयना धरणात तर जवळपास ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. धोम आणि कण्हेर धरणात ८६ टक्के, उरमोडीत ८३ टक्क्यांवर आणि तारळी धरणात जवळपास ९० टक्के पाणीसाठा झालेला आहे.

..............................................................

Web Title: The rains began to increase in the western part; Mahabaleshwar recorded 42 mm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.