बहरात आलेल्या खरिपाकडे पावसाची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:44 IST2021-08-17T04:44:35+5:302021-08-17T04:44:35+5:30
कातरखटाव : खटाव तालुक्यातील पूर्व भागात पावसाने ऐनवेळी पाठ फिरवल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. दिवसभर ऊन आणि पहाटेच धुकं ...

बहरात आलेल्या खरिपाकडे पावसाची पाठ
कातरखटाव : खटाव तालुक्यातील पूर्व भागात पावसाने ऐनवेळी पाठ फिरवल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. दिवसभर ऊन आणि पहाटेच धुकं या खेळामुळे बहरात आलेली शिवारातील पिकं कोमेजू लागली आहेत. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला असून, बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
सध्या कातरखटाव परिसरात खरीप हंगामातील बाजरी, मूग, मटकी, घेवडा, सोयाबीन, उडीद, वाटाणा ही पिके हातातोंडाला आली असली तरी निसर्गाच्यापुढे शेतकऱ्यांनी हात टेकले आहेत. दिवसभर कडाक्याचं ऊन त्यात अधूनमधून पडणारं धुकं यामुळे मूग, उडीद, घेवडा या पिकांनी माना टाकल्या आहेत. काही दिवसांपासून हवामानात बद्दल झाल्याने या भागात लागोपाठ तीन ते चारवेळा धुकं पडल्यामुळे पिकांच्या शेंगा भरण्याऐवजी जळून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.
ट्रॅक्टर नांगरणी, कोळपणी, भांगलणी, महागलेली बी-बियाणे पेरणी, खते असा मिळून एकरी बारा ते तेरा हजार रुपये खर्च येत असून, या करप्या रोगामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे. काही ठिकाणी कडधान्यावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकांवर धुकं पडल्यानंतर तो रोग धुवून जाणे गरजेचं आहे. अशा वातावरणात पावसाचा खंड पडल्याने पिकांच्या शेंगा भरण्याऐवजी आकुंचन पावणे, पानं पिवळंसर पडणे, हळूहळू जळून जाणे असे प्रकार या करप्या रोगामुळे पिकांवर दिसून येत आहेत.
पावसाच्या भरवशावर अवलंबून असणाऱ्या या खरीप हंगामातील पिकं चांगलीच बहरात आलेली दिसत आहेत. क्विंटलमागे दरडोई पाच ते सहा हजार रुपये उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता मात्र दीड ते दोन हजारांवर समाधान मानावं लागणार आहे.
कोट :
शेतकरी सावरतोय तोच संकट
गेली दीड ते दोन वर्षापासून शेतकऱ्यांना सतत आर्थिक संकटाचा फटका बसत आहे. अशातच नेसर्गिक आपत्तीमुळे पिकांचा नाश होत असल्याने शेतकरी कंगाल होत चालला आहे. शेतीची मशागत करण्यापासून पेरणीपर्यंत एकरी बारा ते तेरा हजार रुपये खर्च आला असून, निसर्गाच्या लपंडावामुळे आमचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे प्रशासनाने पाहणी करून नुकसानभरपाई दयावी.
- रामभाऊ बागल, शेतकरी, कातरखटाव
फोटो : १६ कातरखटाव
कातरखटाव परिसरातील हातातोंडाला आलेली घेवडा, मूग ही पिके करपा रोग पडल्याने कोमेजू लागली आहेत.