जिल्ह्याच्या पश्चिम भागात मेघगर्जनेसह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST2021-05-03T04:34:37+5:302021-05-03T04:34:37+5:30
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर, अनावळे, पेट्री तसेच कास पठार परिसरात रविवारी सायंकाळी दोन ते अडीच तास वादळी ...

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मेघगर्जनेसह पाऊस
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर, अनावळे, पेट्री तसेच कास पठार परिसरात रविवारी सायंकाळी दोन ते अडीच तास वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपात पाऊस पडला. बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारांचा पाऊस देखील झाला. यामुळे रस्त्यावर तसेच शेतात पाणीच पाणी साचले होते.
सलग पाच दिवस काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. या परिसरात सायंकाळी चार वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. दोन ते अडीच तास पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाळ्यासारखा पाऊस पडून सर्वत्र ओढे मोठ्या प्रमाणावर वाहत होते. रस्त्यावर तसेच काही ठिकाणी शेती पाण्याने तुडुंब भरून एकीव धबधबा देखील पूर्ण क्षमतेने खळाळून वाहत होता. कास रस्त्यावर काही ठिकाणी चिखल झाल्याने चारचाकी वाहने फसल्याचे दिसून येत होते.
सध्या कास तलावात नऊ फूट पाणीसाठा शिल्लक असून आजच्या मुसळधार पावसाने तलावातील पाणीसाठा काही प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे. काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढतच असताना गेल्या चार दिवसांपासून झालेल्या पावसाने तसेच आजच्या मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण होण्यास मदत झाली आहे. जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा साठवून रचलेल्या गवताच्या गंजी भिजल्या गेल्या. काही ठिकाणी घरासमोरील बांबूचा मांडव पडला गेला. तसेच सड्यावरून पाणी वाहत होते. लहान मुलांनी पावसात भिजण्याचा तसेच गारा झेलण्याचा आनंद घेतला.
चौकट
कास पठाराच्या सड्यावरून पाणी
मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने कास पठाराच्या सड्यावरून पाणी वाहू लागल्याने तलावाकडे जाणाऱ्या पठारालगत असणारा छोटा धबधबा वाहू लागला. तसेच सड्यावरून पूर्वेला वाहणाऱ्या पाण्यामुळे कित्येक दिवस कोरडा असणारा पारंबे फाट्यापासून उजवीकडे चार किलोमीटर अंतरावरील एकीव धबधबाही मोठ्या प्रमाणावर कोसळू लागला.
फोटो सागर चव्हाण यांनी मेल केला आहे.
कास पठार परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे खळाळून वाहत होते. (छाया : सागर चव्हाण)