माणिक डोंगरेमलकापूर : सध्या सर्वत्र वळवाच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मलकापूर परिसरासह वारुंजी फाटा येथे मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत. या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर लावलेल्या वीटभट्ट्या ढासळल्यामुळे व कच्च्या मातीच्या विटा विरघळल्याने अनेक ठिकाणी वीटभट्टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वळवाच्या तडाख्याने वीटभट्टी मालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून नुकसानभरपाईचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण भागातील काही शेतकरी वीटभट्टीचा व्यवसाय करतात. गेल्या चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने वीटभट्टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होऊन त्यांना आर्थिक फटका बसला आहे. वीटभट्टीत भाजण्याच्या तयारीत असलेल्या तसेच तयार करून ठेवलेल्या कच्च्या मातीच्या विटा पावसाने विरघळल्याने वीटभट्टी मालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र, शासनाकडून वीटभट्टी व्यावसायिकांना नुकसानभरपाई दिली नसल्याची सर्वत्र चर्चा आहे.
पुन्हा व्यवसाय आर्थिक संकटात..सिमेंट विटा तसेच सिफॉरेक्स विटांनी मातीच्या विटांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यानंतर मे महिन्यातच कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वीटभट्टी मालकांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवले आहे.
नुकसानभरपाईची मागणीअनेक वीटभट्टी व्यावसायिक कर्जाने पैसे घेऊन वीटभट्टी व्यवसायाची सुरुवात करतात. मात्र, पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाने करावे व वीटभट्टी व्यावसायिकांना भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी, अशी मागणी वीटभट्टी व्यावसायिकांकडून केली जात आहे.
कर्मचाऱ्यांचा आर्थिक भार मालकावर..वीटभट्टीवर काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह दररोजच्या देवाणघेवाणीतून सुरू असतो. हा व्यवहार व्यवसाय सुरू असताना खर्च करणे मालकाला फार कठीण नसते. मात्र व्यवसायावर अचानक अस्मानी संकटाचा घाला झाल्यानंतर या शेकडो कर्मचाऱ्यांचा आर्थिक भार मालकावरच येऊन पडतो. जोपर्यंत व्यवसाय सुरू होत नाही तोपर्यंत हा भार सांभाळताना मालक मेटाकुटीस येतात.