पाऊस अवकाळी.. द्राक्षबागांना अवकळा!
By Admin | Updated: March 4, 2016 00:58 IST2016-03-03T22:48:03+5:302016-03-04T00:58:03+5:30
कोट्यवधींचे नुकसान : गारांच्या मारामुळे द्राक्षे फुटली;

पाऊस अवकाळी.. द्राक्षबागांना अवकळा!
युरोप देशातील निर्यातीवर परिणाम; मायणी भागात नुकसानीचे पंचनामे सुरू मायणी : मायणीसह परिसरातील गारुडी, हिवरवाडी, मुळीकवाडी, कलेढोण, आदी भागांमध्ये तीन दिवसांपासून पडत असणाऱ्या अवकाळी पावसामुळे परिसरातील द्राक्षबागायती क्षेत्रासह जिरायत क्षेत्राचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. गारपीट व वादळी वाऱ्यामुळे परदेशात जाणाऱ्या द्राक्षांचे प्रमाण घटल्यामुळे परकीय चलनावरच थेट परिणाम झालेला आहे. कलेढोण परिसरासह गारुडी, गारळेवाडी, मुळीकवाडी, कान्हरवाडी, पाचवड, तरसवाडी आदी भागामध्ये सुमारे ७०० ते ८०० एकर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. एक एकर द्राक्षबाग लागवडीसाठी साधारणत: तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. तसेच एक एकर युरोप (परदेशी) मार्केटमध्ये पाठविण्याचा खर्चही तीन ते चार लाख रुपये होत असतो. यामध्ये छाटणीपासून ते द्राक्षाच्या गाडीचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी लागणी, औषधे व इतर खर्चही मोठ्या प्रमाणात येत असतो. कमी पावसाचे प्रमाण असणाऱ्या या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी द्राक्ष शेतीकडे आपला मोर्चा वळविला. यातून हजारो एकर क्षेत्र उभा राहिला; पण नोव्हेंबर, डिसेंबरपासूनच विहिरी, बोअरवेलचे पाणी कमी पडण्यास सुरुवात होते. त्यावेळीपासून द्राक्ष तोडणी होईपर्यंत काही शेतकरी टँकरने पाणी पाजून बागा जगवत असतात. जे शेतकरी टँकरने पाणी देतात त्यांना आठवड्याला सुमारे दोन ते अडीच हजार खर्च होत असतो. अशा बिकट परिस्थितीत हे द्राक्ष क्षेत्र उभी राहत आहे. मागील तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे. गारा पडल्यामुळे घडातील द्राक्षाचे मनी फुटले आहेत. यामुळे द्राक्षांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर अशी खराब द्राक्षे आता युरोपीय बाजारपेठेमध्ये जाऊ शकत नाहीत. गाराचा मार लागलेले द्राक्षाचे घड दोन ते तीन दिवसांमध्ये काळपट पडू लागतात. त्याचा काहीही उपयोग होत नाही. ते द्राक्षाचे घड मनुका बनविण्यासाठीही चालत नाही व स्थानिक बाजारपेठेतही त्याला ग्राहक मिळत नाही. जर एक एकर क्षेत्रातील १५ टन द्राक्षे परकीय बाजारपेठेत सरासरी ४० ते ५० रुपये दरानी गेली तरी एक एकर क्षेत्रात सुमारे सहा ते आठ लाखांपर्यंत परकीय चलन मिळू शकते. पण ती आशा आता संपली आहे. गारुडी व कलेढोण या दोन ठिकाणी द्राक्षांच्या बागा वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. (वार्ताहर) ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा आदी पिकांची काढणी, मळणीचाही हंगाम सध्या सुरू आहे. अनेकांच्या शेतात ज्वारी, गहू उभे आहेत, तर काहींनी काढून खाली टाकलेल्या आहेत. त्यामुळे चांगल्या गहू-ज्वारीला २००० ते ३००० पर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत असतो; पण जर हे धान्य भिजले तर लाल व पांढरे पडण्याची शक्यता असते. ज्वारी व बाजरीपासून मिळणाऱ्या कडब्यावर येथील जनावरांचा वर्षाचा चारा प्रश्न मार्गी लागत असतो; पण अवकाळी पावसामुळेही जनावरांचा चारा प्रश्न उभा राहिलेला आहे, अशाप्रकारे या तीन-चार दिवसांच्या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. द्राक्ष निर्यातीवर परिणाम युरोपीय बाजारपेठेत जाणाऱ्या द्राक्षाची डिसेंबर-जानेवारीपासूनच बागायतदारांची लगबग सुरू असते. व्यापारी येतात अन् मालाचे नमुने घेऊन जातात. त्यांच्याकडून सकारात्मकता दर्शविली गेल्यास दोन-तीन दिवसांत द्राक्षाची तोडणी सुरू होते. युरोप व स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात येणाऱ्या द्राक्ष बागा जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. चाळीस टक्के तोडणी अद्याप बाकी आजअखेर परिसरातील ६० ते ७० टक्के क्षेत्रातील द्राक्षांची तोडणी झालेली आहे. अजून ३० ते ४० टक्के क्षेत्रातील द्राक्षांची तोडणी बाकी आहे. एक एकर क्षेत्रातील साधारणपणे १० ते २० टनांपर्यंत द्राक्षे ही युरोपीय बाजारपेठेत जात असतात. यातून मोठ्या प्रमाणात परकीय चलत मिळत असते.