‘पर्ल्स’च्या विरोधात तक्रारींचा ‘पाऊस’
By Admin | Updated: November 12, 2014 23:20 IST2014-11-12T21:50:31+5:302014-11-12T23:20:41+5:30
गुंतवणूकदारांची पाचावर धारण : दिवसभरात ७२ तक्रारी दाखल

‘पर्ल्स’च्या विरोधात तक्रारींचा ‘पाऊस’
सातारा : ‘पर्ल्स’ने गंडविलेल्या ठेवीदारांच्या तक्रारदारांचा ओघ वाढतच असून, दररोज आता येथे तक्रारीचा पाऊस पडू लागला आहे. गेल्या चार दिवसांत येथे जवळपास ५७२ ठेवीदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. बुधवारी ७२ तक्रारी दाखल झाल्याची माहिती तक्रार लिहून घेणारे गणेश पाटणे यांनी दिली.
‘पर्ल्स’ कंपनीने साताऱ्यातील सात हजारांहून अधिक ठेवीदारांच्या शेकडो कोटींंच्या ठेवी लाटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच गेल्या वर्षभरात अनेक एजंटांनी ठेवीदारांची रक्कम कंपनीमध्ये जमा केली नसल्याचे उघड झाले आहे. चार-पाच हजारांहून अधिक ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपल्यामुळे ते आता एजंटांच्या शोधात आहेत. काही ठिकाणच्या एजंटांनी पळ काढला असून, त्यांचा थांगपत्ता लागत नाही.
‘पर्ल्स’बाबत ‘लोकमत’ने वस्तुस्थिती मांडल्यानंतर सात हजार ठेवीदारांचे धाबे दणाणले. त्यातच सातारा कार्यालयाच्या अखत्यारित बारामती तसेच अन्य जिल्ह्यांतील ठेवीदारांची रक्कम येत असल्यामुळे त्यांच्याही फेऱ्या वाढल्या आहेत. पर्ल्सने गंडविलेल्या रकमेचा आकडा मोठा असल्यामुळे आणि ठेवीदारांची आयुष्यभराची पुंजी यामध्ये अडकल्यामुळे अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, तात्या सावंत, सर्जेराव पाटील, मिलिंद कासार, चाँदगणी आत्तार आणि सहकाऱ्यांनी ‘पर्ल्स ठेवीदार बचाव कृती समिती’ स्थापन केली असून, त्यांच्याकडे चार दिवसांत ५७२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)