कोरेगाव तालुक्यातील रेल्वे स्थानके पडली ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:46+5:302021-01-08T06:05:46+5:30
कोरेगाव : सांगली कोल्हापूरसह पुणे जिल्ह्याला जोडणारा मिरज-पुणे रेल्वेमार्ग कोरेगाव तालुक्यासाठी सर्वांत सोईचा आहे. एस. टी. बससेवेपेक्षा कमीत कमी ...

कोरेगाव तालुक्यातील रेल्वे स्थानके पडली ओस
कोरेगाव : सांगली कोल्हापूरसह पुणे जिल्ह्याला जोडणारा मिरज-पुणे रेल्वेमार्ग कोरेगाव तालुक्यासाठी सर्वांत सोईचा आहे. एस. टी. बससेवेपेक्षा कमीत कमी तिकिटामध्ये लांब पल्ल्याच्या प्रवास होत असल्याने प्रवाशांची रेल्वेप्रवासाला पसंती होती. सध्या मात्र कोरोनाचे कारण देऊन पुणे-कोल्हापूर मार्गावरील पॅसेंजर सेवा बंद करण्यात आली आहे. दिवसभरात केवळ दोन एक्सप्रेस धावत असल्याने, त्यांच्यावरच प्रवाशांना विसंबून राहावे लागत आहे. एकंदरीत तालुक्यातील सर्वच रेल्वेस्थानके ओस पडली आहेत. त्याचा थेट परिणाम तालुक्याच्या अर्थकारणावरही झाला आहे.
कोरेगाव तालुक्यात वाठार स्टेशन, पळशी, कोरेगाव, रहिमतपूर व तारगाव अशी रेल्वेस्थानके आहेत. त्याचबरोबर भाडळे खोऱ्याला सातारा तालुक्यातील जरंडेश्वर रेल्वेस्थानक सोईचे पडते. कोरोना काळापूर्वी पूर्ण क्षमतेने रेल्वेची वाहतूक सुरू असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी असायची. साताऱ्यातून कोल्हापूरला पहाटे जाणारी पॅसेंजर ही जणू काही देवाची गाडी असल्याप्रमाणे पूर्णपणे भरलेली असायची, तीच अवस्था सातारा ते पुणे जाणाऱ्या पॅसेंजरची होती.
कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस व कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस या दोनच एक्सप्रेस सध्या मिरज-पुणे मार्गावर धावत असून, त्यांना मोजकेच थांबे आहेत. त्याचबरोबर या एक्सप्रेसमधून प्रवास करण्यासाठी किमान एक दिवस आधी आरक्षण करावे लागत असल्याने प्रवाशांनी या दोन्ही एक्सप्रेसकडे पाठ फिरवली आहे. ऑनलाईन आरक्षण करण्याची प्रक्रिया ग्रामीण भागातील प्रवाशांना माहीत नसल्याने, त्याचा परिणाम या एक्सप्रेसच्या उत्पन्नावर झाला आहे.
कोरोना काळापूर्वी विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईतून भाविक गोंदवले व पुसेगाव येथे जाण्यासाठी कोरेगाव रेल्वेस्थानकावर उतरत आणि तेथून एस. टी. बसेसद्वारे अथवा खासगी वाहनाने गोंदवले व पुसेगावकडे जात. या प्रवाशांचा ओघ आता थांबला आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच पार्सल सेवाही बंद झाल्याने व्यापारीवर्गालाही फायदा उरलेला नाही.
चौकट
कोयना एक्सप्रेसवर सर्वाधिक अन्याय
मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम तिन्ही जिल्ह्यांत युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर कोरोनापूर्वी पुणे-मुंबईदरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने अनेक मार्गांवरील एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कोयना एक्सप्रेसचा सर्वाधिक समावेश होता. दिवसा उजेडात कोल्हापूरहून मुंबईकडे अगदी वेळेवर धावणारी गाडी अशी कोयना एक्सप्रेसची ओळख होती. मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दीड वर्षात जणू तिची ओळखच बदलून टाकली की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. लॉकडाऊननंतर ही एक्सप्रेस सुरु झाली असली तरी २०२० या वर्षअखेरीस आणि नववर्षाच्या प्रारंभी तीन ते चार दिवस ती बंद ठेवण्यात आली होती. एकूणच पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांच्या गळ्यातील ताईत असलेल्या कोयना एक्सप्रेसवरच सर्वाधिक अन्याय झाला असल्याची प्रवाशांची भावना आहे.