मामाच्या गावाला जाणारी रेल्वे डोंगरात बंद पडली!
By Admin | Updated: November 7, 2015 23:39 IST2015-11-07T22:54:07+5:302015-11-07T23:39:41+5:30
महाराष्ट्र एक्सप्रेस : वाठार स्टेशन स्थानकापर्यंत शेकडो प्रवाशांची पायपीट

मामाच्या गावाला जाणारी रेल्वे डोंगरात बंद पडली!
वाठार स्टेशन : महाराष्ट्र एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ऐन दिवाळीत तब्बल दोन तास प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गावर आदर्की ते वाठार स्टेशन या रेल्वेस्थानकादरम्यान शनिवारी सकाळी सव्वा सात वाजता ही घटना घडली. दिवाळी सणानिमित्त आपल्या गावांकडे जाणाऱ्या प्रवाशांना पायपीटही करावी लागली.
याबाबत रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गोंदियाहून कोल्हापूरला निघालेली महाराष्ट्र एक्सप्रेस (११०४०) ही प्रवाशी गाडी शुक्रवारी सकाळी आठ वाजता गोंदियावरून सुटली होती. दिवाळीच्या सुटीमुळे या गाडीला मोठी गर्दी होती. शनिवारी सकाळी आदर्की स्थानक सोडल्यानंतर सव्वासात वाजता तडवळे संमत वाघोली, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत आल्यावर गाडीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे गाडी जागीच थांबवण्यात आली.
या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नऊ वाजण्याच्या सुमारास मालगाडीचे इंजिन जोडून गाडी पुढे रवाना झाली.
दरम्यान, वाठार स्टेशनला येणाऱ्या काही प्रवाशांना महाकाली मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरील सातारा-लोणंद रस्त्यावर येऊन खासगी वाहनाने पुढील प्रवास करावा लागला. (वार्ताहर)
मालगाडीच्या इंजिनचा आधार
दरम्यान, कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेली मालगाडी आठ वाजून सहा मिनिटांनी वाठार स्टेशन स्थानकावर आल्यानंतर तिच्या तीन इंजिनपैकी दोन इंजिन्स पाठवून ती महाराष्ट्र एक्सप्रेसला जोडण्यात आली. त्यानंतर नऊ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र एक्सप्रेस वाठार स्टेशन स्थानकात आणण्यात आली. नंतर ती कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली.
खोळंबा झाल्याने प्रवाशांची चिडचिड
आदर्की आणि वाठार स्टेशन स्थानकाच्या मध्येच रेल्वे बंद पडल्याने प्रवासी गोंधळून गेले. दिवाळीसाठी गावाच्या ओढीने निघालेल्या प्रवाशांना या प्रकाराने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. आता पुढचा प्रवास कसा होणार, या चिंतेने प्रवाशांची चिडचिड झाली. काही प्रवाशांनी पायपीट करून वाठार स्टेशन गाठले व खासगी वाहनाने पुढील प्रवास केला.