रायगड पोलिसांची साताऱ्यात मारहाण!

By Admin | Updated: December 20, 2015 00:39 IST2015-12-20T00:34:29+5:302015-12-20T00:39:44+5:30

दोघे जखमी : पोलीस ठाण्यासमोर संतप्त जमाव; अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी

Raigad police beat up Satara! | रायगड पोलिसांची साताऱ्यात मारहाण!

रायगड पोलिसांची साताऱ्यात मारहाण!

सातारा : साताऱ्यातील दोघांना चोरीच्या संशयावरून जबर मारहाण करणाऱ्या रायगडच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करीत सातारा शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने नातेवाईक व ‘रिपाइं’चे कार्यकर्ते जमा झाले. पोलिसांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव निघून गेला.
दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्या दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी विनोद घाडगे याच्या वडिलांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे.
याबाबत घटनास्थळावरून व ‘रिपाइं’ पदाधिकारी, नातेवाइकांनी दिलेली माहिती अशी की, सुमारे १५ दिवसांपूर्वी सैदापूर (सातारा) येथील विनोद जगन्नाथ घाडगे आणि साताऱ्यातील गुरुवार परज येथील बशीर शेख या दोघांना रायगड जिल्'ातील माणगाव पोलिसांनी एका चोरीच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी एका पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण करून दोघांना परत साताऱ्यात आणून सोडले. त्यानंतर दि. ७ डिसेंबरला हेच पोलीस उपनिरीक्षक साताऱ्यात आले. त्यांनी विनोदला फोन करून बोलावून घेऊन एका लॉजमध्ये मारहाण केली. ‘तुझ्याबरोबर चोरीत कोण-कोण आहेत?,’ अशी विचारणा केली. तसेच ‘तुझा एन्काउंटर करू, मोक्का लावू,’ अशी धमकीही दिली.
त्यावेळी विनोदला मारहाणीमुळे त्रास झाल्याने त्याला साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवार, दि. १८ रोजी पुन्हा रायगड पोलिसांनी विनोद आणि बशीरला साताऱ्यातून ताब्यात घेतले. एका वाहनातून त्यांना कऱ्हाडच्या दिशेने नेण्यात आले. संपूर्ण वाटेत पोलिसांनी दोघांनाही मारहाण केली. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनाही येथील गुरुवार परजावर सोडून देण्यात आले. दोघेही बेशुद्धावस्थेत होते. कोणीतरी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सातारा पोलिसांनी दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
शनिवारी सकाळी नातेवाइकांना मारहाणीचा हा प्रकार समजल्यानंतर ‘रिपाइं’च्या पदाधिकाऱ्यांसह सर्वजण जिल्हा रुग्णालयातून सातारा शहर पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी जमावाचे बोलणे ऐकून घेतले. ‘तुमचा जबाब घेऊ, चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू,’ असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पण जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. ‘डोंगरे नामक अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद करा,’ अशी मागणी करत त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर, पोलीस उपअधीक्षक धरणे यांना जमावासमोर येऊन ‘संबंधितांवर कारवाई करू,’ असे आश्वासन द्यावे लागले. त्यानंतर जमाव निघून गेला.
यावेळी ‘रिपाइं’चे किशोर तपासे, शरद गायकवाड, अप्पा तुपे, अण्णा वायदंडे, भूपाल घाडगे, किशोर गालफाडे, वैभव गायकवाड, शिवराज म्हस्के आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दोघांचाही जबाब नाही...
नातेवाइकांनी जखमींचा जबाब घेण्याची मागणी केली होती; पण रात्री उशिरापर्यंत जखमींचा जबाब घेण्यात आलेला नव्हता. जखमी दोघांवरही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Raigad police beat up Satara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.