रब्बी हंगामातील पिके काढण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST2021-02-27T04:51:33+5:302021-02-27T04:51:33+5:30
खटाव : खटावसह परिसरात सध्या रब्बी हंगामातील पिकाची काढणीची लगबग सुरू असल्यामुळे आता शिवारात शेतकरी आणि मजुरांची गडबड सुरू ...

रब्बी हंगामातील पिके काढण्याची लगबग
खटाव : खटावसह परिसरात सध्या रब्बी हंगामातील पिकाची काढणीची लगबग सुरू असल्यामुळे आता शिवारात शेतकरी आणि मजुरांची गडबड सुरू आहे.
रब्बी हंगामातील ज्वारी तसेच हरभरा, गहू आदी पीक काढणीची गडबड सुरू असतानाच दुसरीकडे मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतित झाला आहे. तर सर्वत्र सुगीची गडबड असल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. प्रत्येकाची आपापल्या परीने शेतातील माल पावसाच्या आधी सुरक्षितपणे घरी आणण्याची गडबड दिसून येत आहे.
वातावरणातील बदल, दिवसा ऊन, दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण व सायंकाळी पावसाची भुरभुर यामुळे शेतकऱ्याची धांदल उडत आहे. सध्या ज्वारी काढणीसाठी पुरुष मजुरांना ५०० रुपये तर महिला मजुरांना ३०० रुपये मजुरी असून मजुरांच्या टोळ्या असून शेतकरी त्यांना घेऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांसह शेतात हातातोंडाशी आलेले पीक पदरात घेण्याच्या लगबगीत दिसून येत आहे.
(चौकट)
अवकाळीची धास्ती, त्यातच ऐन सुगीच्या कालावधीत रोज येणारे आभाळ व पडणाऱ्या बारीक पावसाच्या सरीमुळे शेतकरी चिंतीत आहे. पीक काटणीच्या मोक्यात पावसाळी वातावरण येत असल्यामुळे निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्याची शेतात काम करण्याची लगबगही दिसून येत आहे. मध्यंतरी अवकाळी पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बऱ्याच क्षेत्रातील ज्वारी आडवी झाली आहे. त्यामुळे ज्वारी काढण्यास वेळ लागत आहे.
(कोट..)
वातावरणातील बदलामुळे पिकांवर परिणाम..
सुरुवातीला पावसाने वेळेत हजेरी लावल्यामुळे पेरणी वेळेत केली. योग्य प्रमाणात पाण्याचे नियोजन झाल्यामुळे पिकेही अपेक्षेपेक्षा चांगली आली आहेत. परंतु मध्यंतरी हवामानात झालेल्या बदलामुळे पिकावर थोडाफार प्रमाणात परिणाम होणार आहे. परंतु मजुरांची चणचण सर्वच शेतकऱ्यांना जाणवत आहे.
-उत्तम बोर्गे, शेतकरी खटाव
२६नम्रता भोसले...
कॅप्शन : खटावमध्ये सध्या रब्बी हंगामातील ज्वारी काढणीची लगबग सुरू आहे.