लस घेण्यासाठी पहाटे पाचला लावतायत रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:42 IST2021-05-21T04:42:17+5:302021-05-21T04:42:17+5:30
सातारा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लस घेण्यासाठी नागरिक पहाटे पाचला लसीकरण केंद्रांवर रांगा लावत आहेत. लसीचे डोस शिल्लक असलेल्याचा ...

लस घेण्यासाठी पहाटे पाचला लावतायत रांगा
सातारा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लस घेण्यासाठी नागरिक पहाटे पाचला लसीकरण केंद्रांवर रांगा लावत आहेत. लसीचे डोस शिल्लक असलेल्याचा फलक तसेच लसीकरण करणाऱ्यांना देण्यात येणारे टोकण अशी सुविधा प्रशासनाने केली असली तरी लसीकरण केंद्रांवरील गर्दी काही कमी होताना दिसत नाही. डोस रोज एक हजार असले तरी गर्दी मात्र दोन हजार नागरिकांची होत आहे. त्यामुळे प्रशासनही मेटाकुटीला आले असल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात दीड महिन्यांपूर्वी दिवसाला २८ हजार लसीकरण होत होते. मात्र, सध्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाले असून जिल्हा प्रशासनाकडे वारंवार लसीचा तुटवडा होत आहे. मात्र, नागरिकांना लसीचा तुटवडा आहे की नाही हे समजत नाही. त्यामुळे लस मिळेल, या आशेवर लोक पहाटे पाच वाजता घरातून बाहेर पडत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये २ केंद्र तर राजवाड्यावरील कस्तुरबा रुग्णालयामध्ये एक केंद्र सुरू करण्यात आले आहे. या तिन्ही केंद्रांवर रोज दोन ते तीन हजार लोक लसीसाठी येत आहेत. बुधवारी लसीकरण बंद होते तरीसुद्धा लोक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावरून येऊन परत घरी गेले तर गुरुवारी संपूर्ण जिल्ह्याला ८५५० डोस मिळाले. त्यामुळे गुरुवारीही अडीच ते तीन हजार लोक जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणासाठी आले होते. परंतु या केंद्रावर बाराशे डोस देण्यात आले होते. बाहेर फलकांवर डोस किती शिल्लक आहेत, किती टप्प्यात लसीकरण दिवसभरात करण्यात येणार आहे, अशी सर्व माहिती लिहिण्यात आली होती. मात्र, तरीसुद्धा फलकाकडे दुर्लक्ष करून अनेकजण पहाटे पाच वाजल्यापासून रांगेमध्ये उभे होते. ज्यांना टोकन मिळाले होते, असे लोक झाडाखाली गप्पा मारत बसले होते. परंतु ज्यांना टोकन मिळाले नव्हते असे लोक रांगा लावून उभे होते. आतून अनेक कर्मचारी तुम्ही उद्या लसीसाठी या, असे सांगत होते. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आम्ही सकाळपासून इथे उभे आहोत. त्यामुळे आम्हाला लसीकरण करावे, अशी मागणी नागरिक करत होते.
जिल्ह्यात ४४६ लसीकरण केंद्र आहेत. मात्र, यातील गुरुवारी केवळ ५० लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती.
चौकट :
नागरिकांचाही नाईलाज
लसीचा वारंवार तुटवडा होत असल्याने नागरिकांना लस संपेल याची धास्ती लागली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आज घरातून बाहेर आलोय तर लस घेऊनच घरी जाणार, असा ठाम निश्चय अनेकांनी केला होता; परंतु लसच नाही म्हटल्यावर त्यांचाही नाईलाज झाला.
चौकट :
सर्वाधिक सिव्हीलमधील केंद्रांवर गर्दी
जिल्ह्यामध्ये एकूण ४४६ लसीकरण केंद्र आहेत. त्यामध्ये सर्वांत जास्त गर्दीचे केंद्र म्हणून सिव्हील ओळखले जात आहे. या केंद्रावर रोज अडीच ते तीन हजार लोकांची रांग लागल्याचे पाहायला मिळते. या केंद्रामध्ये ५ डेटा ऑपरेटर, ४ परिचारिका आणि २ डॉक्टर यांच्यावरच या लसी केंद्राची मदार आहे. सकाळी नऊला केंद्र सुरू होते. सायंकाळी सात तर कधी आठ नाहीतर लस संपेपर्यंत रात्री उशिरापर्यंत सुरू राहते.
चौकट :
आरोग्य विभाग चिंतेत
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने आरोग्य विभागाने कोरोना लसीचा वेगही वाढवला आहे. त्यामुळे दिवसाला जवळपास आठ हजार डोसची गरज भासत आहे. असे असताना आता केवळ सात ते आठ हजार डोस प्रशासनाकडून येत आहेत. त्यामुळे ही लसीकरण मोहीम कशी सुरू ठेवायची, या चिंतेत आरोग्य विभाग आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने सर्वांत जास्त भर दिला आहे तो म्हणजे लसीकरणावर. जितक्या वेगाने लसीकरण होईल तितके रुग्ण कमी होतील, असे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
चौकट :
मागणी पाच लाखांची
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग पाहता आरोग्य विभागाने पाच लाख डोसची गरज असल्याची मागणी केली आहे; परंतु या मागणीनुसार सातारा जिल्ह्याला डोस उपलब्ध होत नाहीत, अशी खंतही आरोग्य अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे आणखीनच लस कमी पडत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.