लोकशाहीच्या अस्तित्वाचा आता प्रश्न निर्माण झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:36+5:302021-02-07T04:36:36+5:30
वडूज : ‘केंद्र सरकारकडून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना वागणूक दिली जात आहे, आपल्या हक्कासाठी न्याय ...

लोकशाहीच्या अस्तित्वाचा आता प्रश्न निर्माण झाला
वडूज : ‘केंद्र सरकारकडून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना वागणूक दिली जात आहे, आपल्या हक्कासाठी न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, गोळीबार केला जात असेल तर देशात लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे,’ असे प्रतिपादन स्वाभिमानी युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी केले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रणजितसिंह देशमुख, राज्याचे प्रवक्ते अनिल पवार, अशोक गोडसे, डॉ. विवेक देशमुख, मानाजी घाडगे, विजय शिंदे, सूर्यकांत भुजबळ, भरत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘गेले ७० दिवस शेतकरी ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता रस्त्यावर बसून कृषी विधेयके माघार घ्यावीत, अशी मागणी करत असताना जवळजवळ १६० शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे. तरीही केंद्र सरकारने केलेली कृषी विधेयके शेतकऱ्यांना मान्य नसतील तर ती हुकूमशाही पद्धतीने शेतकऱ्यांवर का लादली जात आहेत. केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी देशाच्या शेतकऱ्यांचा बळी दिला जातोय, तर ही लाजिरवाणी बाब आहे.
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशात चक्काजाम आंदोलन जाहीर केले. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण राज्यात केंद्र सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून वडूज येथे केंद्र सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत एक तासाचा लाक्षणिक रास्ता रोको केला. या आंदोलनात महेश गुरव, जाकीर पठाण, परेश जाधव, डॉ. संतोष गोडसे, अमित देशमुख, ईश्वर जाधव, भीमराव खिलारे, राहुल सजगणे, ज्ञानेश्वर इंगवले, स्वाभिमानीचे युवा तालुकाध्यक्ष सचिन पवार, तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे, भुरकवडी, भोसरे, कातरखटाव उंबर्डेचे शेतकरी व तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०६वडूज
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसने वडूज तहसील कार्यालयाबाहेर चक्काजाम आंदोलन केले.