वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील धावली ते कोंढवली अशा धोम जलाशयामध्ये ७०० मीटर लांबीचा व ५०० मीटर जोडरस्ता असणाऱ्या पुलाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या शिफारसीनंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या पुलासाठी ८० कोटींचा निधी देण्याची ग्वाही दिली आहे.
वाई तालुक्यातील धावली, कोंढवलीसह अनेक गावांमधील जनतेकडून दळणवळणाबाबतच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारी घेऊन सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. त्यांना वाई तालुक्यातील ग्रामस्थांच्या सोयी-सुविधांविषयी माहिती दिली. तसेच धावली ते कोंढवली असा धोम जलाशयामध्ये ७०० मीटर लांबीचा व ५०० मीटर जोडरस्ता असणारा मोठा पूल करणे गरजेचा असून, तो उभारण्यात यावा, अशी मागणी केली. नाना पटोले यांनी याची तत्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे विराज शिंदे यांची भेट घडवली.
दरम्यान, वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिफारसही केली. मंत्री अशोक चव्हाण यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर ८० कोटींचा निधी देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, दुर्गम भागातील जनतेचा तब्बल ४० ते ५० वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्यावर या भागामध्ये पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. तसेच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असा विश्वास विराज शिंदे यांनी व्यक्त केला.