शेजाऱ्याशी भांडण? पंचवीस किलोमीटर पळा!
By Admin | Updated: December 10, 2014 23:51 IST2014-12-10T22:33:33+5:302014-12-10T23:51:53+5:30
आर्थिक वाद वाढले : शिरवळ परिसरात चार पोलीस चौक्यांची गरज

शेजाऱ्याशी भांडण? पंचवीस किलोमीटर पळा!
सुनीता नलवडे - लोहेम -गाव म्हटलं की भांडणतंटा आलाच अन् शेजार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण अशा शेजाऱ्याशी असणाऱ्या तंट्याचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं तर पंचवीस किलोमीटरवर असणाऱ्या पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन पळावं लागतं. ही स्थिती आहे खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी, खेड मोर्वे, विंग आणि लोहोम या गावांची.
खंडाळा तालुका चारही बाजूंनी विकसित होत असताना तालुक्यातील छोटी-मोठी गावे मात्र भौगोलिक दृष्ट्या मागे पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण खेड्यापाड्यात अजूनही पुरेशा सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे नागरिकांना किरकोळ वादाची तक्रार द्यायची असेल तर खंडाळा, शिरवळ, लोणंद या ठिकाणी जावे लागते. वाठार कॉलनी, खेड-मोर्वे, लोहोम, विंग या गावांमध्ये इतर सुविधा देता येत नसतील तरी प्रशासनाने किमान येथे पोलीस चौक्या तरी द्याव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे.
तालुक्यात खंडाळा आणि लोणंद याठिकाणी पोलीस ठाणे आहे. दोन्ही ठिकाणी सुमारे दीडशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आहेत. त्यामुळे तालुक्यात तिसरे पोलीस ठाणे सुरू करण्याऐवजी ज्याठिकाणी गरज आहे, अशा दुर्गम भागात पोलीस चौक्या उभारणे गरजेचे आहे. असे झाल्यास वाढत्या गुन्हेगारीला आळा बसून डोंगरालगतच्या भागातील जनतेची सोय होणार आहे. जागेवरून, शेतीच्या हद्दीवरून भांडणतंटा होत असतो. अशावेळी तक्रार द्यायला पंचवीस ते तीस किलोमीटरची धावाधाव करावी लागते. प्रशासनाने याचा विचार करून पोलीस चौक्या उभारण्याची मागणी होत आहे.
कर्मचाऱ्यांचे विभाजन करावे
सध्या कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे तसेच नव्याने होऊ घातलेल्या तिसऱ्या पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे विभाजन केल्यास या गावांमध्ये पोलीस चौक्या होऊ शकतात. खंडाळा तालुका डोंगरदऱ्यांच्या कडेने वसला आहे. वाड्या वस्त्यांवर लोक राहत आहेत. त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने विचार करावा.