कऱ्हाड अर्बन बँकेची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव आणि सर्व संचालक, सभासद ऑनलाईन सहभागी झाले होते.
सुभाषराव जोशी म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या नियुक्तीसाठी पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने ही दुरुस्ती करणे अनिवार्य केले आहे. तसेच रिझर्व्ह बँकेने कर्ज व्यवहाराच्या दृष्टीने परिपत्रके, सूचना देऊन वैयक्तिक महत्तम कर्जमर्यादा टायर १ कॅपिटलच्या १५ टक्के व समूहासाठी २५ टक्के निश्चित केली आहे. त्यामुळे सर्वच बँकांची महत्तम कर्जमर्यादा मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशाची आर्थिक व्यवस्था ढासळली होती. मात्र या परिस्थितीतही कऱ्हाड अर्बन बँकेने चांगली कामगिरी करीत गतवर्षीचा ९.७७ कोटींचा संचित तोटा पूर्णपणे निरंक करून ११.०५ कोटींचा निव्वळ करोत्तर नफा मिळविला आहे. मार्च २०२० अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ४ हजार ५०६ कोटी असून, ५४.२७ कोटींचा ढोबळ नफा; तर आयकर व तरतुदी वजा जाता २०.८३ कोटींचा नफा झाला आहे. त्यामध्ये बँकेच्या २३ शाखांना एक कोटीपेक्षा जास्त नफा झाला आहे. भाग भांडवलामध्ये १.५५ कोटींची वाढ झाली आहे. तसेच चालू वर्षात भांडवल पर्याप्तता प्रमाण किमान नऊ टक्के राखण्याचा नियम असताना बँकेने ते प्रमाण १६.५७ टक्के राखून आपली आर्थिक सुदृढता सिद्ध केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी नोटीस व ठराव वाचन केले. उपाध्यक्ष समीर जोशी यांनी आभार मानले. (वा. प्र.)