महामार्गाच्या गुणवत्तेची लक्तरं बारदानात!
By Admin | Updated: April 29, 2016 00:21 IST2016-04-28T23:59:09+5:302016-04-29T00:21:06+5:30
सहापदरीकरणाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह : कामातील ‘चुकांवर पांघरुण’ घालण्याचा महामार्ग प्राधिकरणाचा केविलवाणा प्रयत्न

महामार्गाच्या गुणवत्तेची लक्तरं बारदानात!
राहुल तांबोळी -- भुर्इंज
गरज नसताना सुरु असलेले महामागाचे सहापदरीकरण. अधिकाऱ्यांची मनमानी. कामातील ठासळलेली गुणवत्ता. नियोजनाचा अभाव अन् वाढते अपघात... यामुळे अगोदरच नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. त्यातच बुधवारी भुर्इंज येथे उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला त्यामुळे पुन्हा एकदा महामार्ग प्राधिकरणाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उड्डाणपूल उभारणीत घडलेल्या या अक्षम्य चुकीवर पांघरुण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत महामार्ग प्राधिकरणाने कोसळलेला पूल चक्क बारदानात गुंडाळून ठेवला.
बुधवारी (दि.२७) रात्री आठ वाजता कामगार जेवायला गेले असताना उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला. त्यामुळे जीवितहानी टळली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या घटनेचे गांभीर्य ओळखून गुरुवारी सकाळी लवकर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेप्रकरणी प्रकल्प व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
अधिकारी म्हणतात, ‘काहीच कल्पना नाही!’
भुर्इंज येथील दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बिजेंद्र नावाचे अधिकारी यांनी आपणास काहीच कल्पना नाही, असे सांगून त्यांनी जबाबदारी झटकली. तसेच इतर जबाबदार अधिकारी, सुपरवायझर यांनीही घटनास्थळी थांबण्याचे औदार्य दाखवले नाही. गावातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी या घटनेबाबत संवाद साधला नाही. या दुर्घटनेचे कारण स्पष्ट केले नाही. याबाबतही अनेकांनी संताप व्यक्त केला. यावेळी गजानन भोसले, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश शिंदे, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर भोसले-पाटील, भाऊसाहेब जाधवराव, मधुकर भोसले, किरण शिंदे, नारायण नलवडे, प्रतापराव जाधवराव, भाऊसाहेब शिंदे, शेषा भोसले उपस्थित होते.
संयुक्त बैठक बोलावणार
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स कंपनी, प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व दर्जा देखरेख समिती यांची संयुक्त बैठक बोलावण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी डॉ. अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले. महामार्ग सहापदीरकणाचे काम वेळेत पूर्ण होण्याबरोबरच उत्तम दर्जाचे आणि अपघाताविना होणे आवश्यक आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिस विभागाची जी जबाबदारी असेल, ती बजावली जाईल, असा शब्द त्यांनी दिला.