या कोरोना योद्ध्यांना कुर्निसात घालावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST2021-04-25T04:38:43+5:302021-04-25T04:38:43+5:30
कोरोना महामारीमुळे लोकांची होणारी अवस्था पाहून जिल्हा रुग्णालयांमधील डॉक्टर्स, परिचारिका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची चिंता वाढली. गेल्या दोन वर्षांपासून आपल्या ...

या कोरोना योद्ध्यांना कुर्निसात घालावा!
कोरोना महामारीमुळे लोकांची होणारी अवस्था पाहून जिल्हा रुग्णालयांमधील डॉक्टर्स, परिचारिका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची चिंता वाढली. गेल्या दोन वर्षांपासून आपल्या कुटुंबाला सांभाळत हे कर्मचारी जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करत आहेत.
कोरोना महामारीचा शिरकाव होऊ लागल्यानंतर साताऱ्यामध्ये सिव्हील हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, परिचारिका तसेच इतर आरोग्य कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. कोरोनाग्रस्तांचे मृत्यू डोळ्यासमोर पाहत असताना लोकांनी जागृत व्हावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असा आग्रह हे कर्मचारी करत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून अविरतपणे जिल्हा रुग्णालयातील कक्षाचा पदभार सांभाळणारे डॉ. ज्ञानेश्वर हिरास सांगत होते... कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शासनाने कोरोनाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला माझे १० मार्च २०२० रोजी पुणे येथे ट्रेनिंग झाले. २३ मार्चला सातारा जिल्ह्यामध्ये पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला. त्यानंतर सिव्हीलमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे तसेच समाजमाध्यमातून आवाहन करण्याचे काम माझ्याकडे आले. सुरुवातीला मनुष्यबळ अत्यंत कमी होते. कोरोनाचा हाहाकार होण्यापूर्वीच जिल्हा रुग्णालयामध्ये बेडची व्यवस्था केली. सकाळी साडेआठला ड्युटी सुरू व्हायची ते रात्री साडेबारा, एकपर्यंत काम सुरूच असायचे. ऑक्टोबर २०२०पर्यंत हा ताणतणाव सुरू होता. मात्र, त्यानंतर सगळे अंगवळणी पडले. आपल्यामुळे घरातल्यांना त्रास नको म्हणून सुरुवातीचे सहा महिने घरी गेलो नव्हतो.
जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागाच्या इन्चार्ज असलेल्या विमल घाडगे सांगत होत्या... आमच्या ड्युट्या तीन सत्रात सुरू असतात. या तिन्ही सत्रांमध्ये काम करत होते, मात्र घरी गेल्यानंतर घातलेले कपडे मेडिक्लोरमध्ये गोळ्या टाकत होते. आंघोळ केल्यानंतरच फॅमिलीमध्ये मिक्स होते. सॅनिटायझर, मास्कचा वापर, फेसशिल्ड या गोष्टी काळजीपूर्वक वापरल्या. कोरोनाग्रस्त समोर असताना त्यांच्यावर उपचार करत होते. तीन ते चार महिने मनाला घोर लागला होता की, आपल्यालाही कोरोनाची लागण होऊ शकते. मात्र, कुटुंबाप्रमाणेच रुग्णांची आम्ही काळजी घेतो. डोळ्यासमोर रुग्ण तडफडत असताना लोकांना एवढेच सांगणे आहे की, प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळाव्यात, गर्दी करू नये, बाहेर जाताना मास्कचा वापर करावा. घरात आल्यानंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत. भविष्यातील धोका लक्षात घेऊन लोकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे.
कोट
आमचे एकत्र कुटुंब आहे. माझी सर्व फॅमिली पुण्यात राहते. कोरोनाचे काम पाहायला सुरुवात केल्यानंतर पहिले सहा महिने कुटुंबात जाताच आले नव्हते. सकाळी साडेआठला काम सुरू व्हायचे ते रात्री एक वाजले तरी संपत नव्हते. सुरुवातीला कामाचा ताण आला. मात्र, सततच्या सरावाने ते अंगवळणी पडले. समाज हेच आपले कुटुंब आहे, हा उद्देश डोक्यात ठेवून काम करतोय.
- डॉ. ज्ञानेश्वर हिरास
कोट
गेल्या वर्षभरापासून जिल्हा रुग्णालयामधील कोविड कक्षाच्या विभागाचा चार्ज मी सांभाळत आहे. गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना अनेकदा सुरुवातीचे तीन ते चार महिने असं वाटत राहिलं की, आपल्याला कोरोना झाला की काय? मात्र, धिराने काम करत राहिले, कुटुंबीयांचीही मोठी साथ मिळाली. मानसिकता भक्कम करून काम करत राहिले. कोरोनामुळे तडफडून जीव जात असल्याने लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
- विमल घाडगे, आयसीयू टीम इनचार्ज
- सागर गुजर