भ्रष्टाचारी नेत्यांना जेलमध्ये टाका
By Admin | Updated: March 20, 2016 23:48 IST2016-03-20T22:22:03+5:302016-03-20T23:48:47+5:30
उदयनराजे : अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा; राष्ट्रवादीला घरचा आहेर

भ्रष्टाचारी नेत्यांना जेलमध्ये टाका
सातारा : ‘राज्यात विविध क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. अद्यापही काही नेते भ्रष्टाचार करून नामानिराळे राहिले आहेत. त्यांनाही पहिल्यांदा जेलमध्ये टाका,’ अशी मागणी करत खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधत राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खासदार उदयनराजे म्हणाले, ‘जलजागृती सप्ताहामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकप्रतिनिधींचा सहभाग दिसून आला नाही. अशा लोकप्रतिनिधींना लोकांच्या रोषास आता सामोरे जावे लागणार आहे. पूर्वी ‘पाणी आडवा पाणी जिरवा,’ अशी घोषणा होती; मात्र आता ‘लोकांना आडवा, लोकांची जिरवा,’ अशी घोषणा रूढ होत आहे. भ्रष्टाचार झाल्यामुळे धरणे अपूर्ण राहिली. धरणे पूर्ण झाली असती तर दुष्काळी भागाला पाणी तरी मिळाले असते. त्यामुळे भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधींना शासन झालेच पाहिजे. शेतकऱ्यांची ज्यांनी ही अवस्था केली, त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे. सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळत आहे. याला सर्वस्वी नेतेच जबाबदार आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी नेत्यांना पहिल्यांदा जेलमध्ये टाका. लोकप्रतिनिधींवर लोकांचा अंकुश पाहिजे. तरच विकास होईल.’
छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी तुमच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या कारागृहात गेल्या होत्या. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्याला मग तुमचाही पाठिंबा आहे का? असा प्रश्न खा. उदयनराजे यांना विचारण्यात आला. यावर उदयनराजे म्हणाले, ‘इथे पक्षविरहित भूमिका मांडली पाहिजे. जर भुजबळ यांनी भ्रष्टाचार केला असेल, तर त्यांना शासन होणे गरजेचे आहे. त्यामध्ये मीही असलो तरी मलाही शासन झालेच पाहिजे. अन्य लोकप्रतिनिधी असतील त्यांनाही आता कारागृहात गेलेच पाहिजे; अन्यथा महाराष्ट्रातील लोक जनआंदोलन उभारतील. याला मी मात्र निमित्त असेन,’ असाही इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. (प्रतिनिधी)