उंडाळकरांना धक्का; दक्षिणेत पृथ्वी‘राज’

By Admin | Updated: October 19, 2014 22:46 IST2014-10-19T22:41:14+5:302014-10-19T22:46:07+5:30

सत्तेच्या कवचकुंडलामुळे माजी मुख्यमंत्र्यांना यश : पाटील

Pushing indelkar; South of earth 'raj' | उंडाळकरांना धक्का; दक्षिणेत पृथ्वी‘राज’

उंडाळकरांना धक्का; दक्षिणेत पृथ्वी‘राज’

कऱ्हाड/मलकापूर : राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात अखेर चमत्कार घडला. गत पस्तीस वर्षे एकहाती निवडणूक जिंकणाऱ्या आणि सलग सातवेळा आमदारकी मिळविणाऱ्या विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पराभव करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण १६ हजार ४१८ मताधिक्याने विजयी झाले. पृथ्वीराज चव्हाणांच्या विजयानंतर हजारो कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत विजयोत्सव साजरा केला. दिवसभर शहरात डॉल्बी व बॅन्जोचा आवाज दणाणत होता. दुपारी पृथ्वीराज चव्हाणांची विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीत गुलालामध्ये न्हाऊन निघालेले हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहरातील रत्नागिरी गोदाममध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मतमोजणीला सुरूवात झाली. मुळातच या मतदार संघातील लढत अटीतटीची झालेली.
सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली. या फेरीत शिवसेनेच्या डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांना १३९, ‘भाजप’च्या अतुल भोसले यांना १ हजार ९८१, ‘काँग्रेस’च्या पृथ्वीराज चव्हाण यांना ४ हजार ८७५, ‘बसपा’च्या सतीश रणशिंगारे यांना ४३, ‘मनसे’च्या विकास पवार यांना १५, ‘मविआ’च्या अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांना १३, तर अपक्ष उमेदवार मुसा मुल्ला ८, अ‍ॅड. मिलिंद देसाई १७, अ‍ॅड. विद्युलता मर्ढेकर २८, विलासराव पाटील-उंडाळकर २ हजार ८७४, देवेंद्र शहा ३०, संपत तडाखे २० तर नकाराधिकारात २६ मते मिळाली. पहिल्याच फेरीमध्ये शहरालगतच्या ग्रामीण भागातील मतमोजणी झाली, त्यामध्ये काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी २ हजार १ मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत कोळे गटातील काही भागांतील मतमोजणीत अपक्ष उमेदवार विलासराव पाटील-उंडाळकर यांना नाममात्र ५८ मतांची आघाडी मिळाली़ या फेरीत भाजपचे अतुल भोसले यांनाही बरोबरीने मते मिळाली. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या व सहाव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विलासराव पाटील-उंडाळकर यांना मानणाऱ्या कोळे, येळगाव विभागाच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांची २ हजार १ मतांची आघाडी फेडून उंडाळकरांनी २ हजार ५६ मतांची आघाडी घेतली. या फेरीअखेर भाजपचे अतुल भोसले १० हजार ७०२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते. सातव्या फेरीपासून कऱ्हाड शहरातील मतमोजणीस प्रारंभ झाला. सातव्या फेरीत पृथ्वीराज चव्हाण यांनी ४ हजार ८४२ मते घेतली, तर प्रतिस्पर्धी उंडाळकरांना २ हजार २०८ मते, तर शहरातील भाजपच्या मताधिक्यात वाढ होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे या फेरीत अतुल भोसले यांना २ हजार १८२ मते मिळाली. याच फेरीत उंडाळकरांचे २ हजार ५६ चे मताधिक्य फेडून ५७८ मतांची आघाडी मिळविली. त्यानंतर कऱ्हाड शहरासह मलकापूर येथील केंद्रांची मतमोजणी करण्यात आली. चौदाव्या फेरीत पृथ्वीराज चव्हाण यांना ५८ हजार २२४ तर उंडाळकर यांना ३६ हजार १७६ मते मिळाली़ यामध्ये चव्हाण यांनी २२ हजार ४८ ंचे मताधिक्य घेतले. त्याचबरोबर शहरातील भाजपच्या मतात वाढ होऊन पंधराव्या फेरीअखेर अतुल भोसले यांना ३४ हजार ७०२ मते मिळाली, त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर कोण राहणार, याबाबतची उत्सुकता वाढली. सोळाव्या फेरीमध्ये पुन्हा ग्रामीण भागातील मतमोजणीस प्रारंभ झाल्याने या फेरीत उंडाळकर यांना ३ हजार ४०६ मते मिळाली, तर भाजपचे अतुल भोसले यांना ३ हजार १२५ तसेच पृथ्वीराज चव्हाण यांना २ हजार ६८९ मते मिळाली. तर सतराव्या फेरीत उंडाळकर यांना २ हजार २३६ मतांचे मताधिक्य मिळाले. आठराव्या फेरीत उंडाळकरांच्या मताचे पॉकेट समजल्या जाणाऱ्या उंडाळे गणाची मतमोजणी झाली. या फेरीत उंडाळकरांनी ५ हजार १७२ चे मताधिक्य घेतले. त्यामुळे उंडाळकरांना या फेरीअखेर ५० हजार ८३६ तर पृथ्वीराज चव्हाण यांना ६४ हजार ७५९ मते मिळाली. त्यामुळे या फेरीअखेर चव्हाण यांचे २२ हजारांचे मताधिक्य घटून १३ हजार ९२३ वर आले. तर ४१ हजार १३६ मते घेऊन अतुल भोसले तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांचे निर्णायक मताधिक्य निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. एकोणीसाव्या फेरीत चव्हाण यांना पुन्हा ५०२ जादा मते मिळाली. वीस, एकवीस व बावीस या तीन फेऱ्यांमध्ये रेठरे, वडगाव-हवेली या गटांतील गावांची मतमोजणी झाली. ही गावे अतुल भोसले यांना मानणारी असल्यामुळे भोसलेंना १४ हजार ५१४ मते मिळाली. त्यामुळे बाविसाव्या फेरीअखेर भोसले यांना एकूण ५८ हजार १४१ मते मिळाली. त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण यांनी या तीन फेऱ्यांत ८ हजार ८३ मते मिळवून या फेऱ्यातील दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. या फेरीअखेर चव्हाण यांना एकूण ७६ हजार १८३ मते मिळाली. तर आमदार उंडाळकर यांना तिसऱ्या क्रमांकाची ६ हजार १६९ मते मिळाली़ त्यांना एकूण ५९ हजार ८३७ मते मिळाली. त्यामुळे या फेरीअखेर चव्हाण यांना १६ हजार ३४६ मतांची निर्णायक आघाडी मिळाली. तेवीसाव्या फेरीत गोंदी येथील एकाच बुथची मतमोजणी होती. त्यामध्ये अतुल भोसले यांना २५४, पृथ्वीराज चव्हाण यांना १८८ तर उंडाळकर यांना १२७ मते मिळाली. त्याचबरोबर चोविसाव्या फेरीत पोस्टल मतमोजणी करण्यात आली. यात पृथ्वीराज चव्हाण यांना ४६०, उंडाळकर यांना ४४९ तर अतुल भोसले यांना २२६ मते मिळाली. चोविसाव्या फेरी अखेर पृथ्वीराज चव्हाण यांना ७६ हजार ८३१, अपक्ष विलासराव पाटील-उंडाळकर यांना ६० हजार ४१३ तर भाजपचे अतुल भोसले यांना ५८ हजार ६२१ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे १६ हजार ४१८ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले.

रस्त्यावर प्रचंड गर्दी
त्यामुळे सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर उत्सुकतापूर्ण वातावरण तयार झाले होते. केंद्रानजीकच्या भेदा चौक, कार्वे नाक्याकडे जाणारा मार्ग व पोपटभाई पेट्रोल पंप चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर हजारो कार्यकर्ते निकाल ऐकण्यासाठी थांबून होते.

कऱ्हाडकरांनी काँग्रेसची परंपरा राखली : चव्हाण
कऱ्हाड दक्षिण हा माझा घरचा मतदारसंघ होता़ येथून काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा मी निर्णय घेतला़ काँग्रेस विजयाची परंपरा जोपासणाऱ्या मतदारांनी या वेळेलाही ही परंपरा कायम ठेवली़ त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो़ निवडणूक काळात प्रचारासाठी मी राज्यभर फिरत होतो़ त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने जी जबाबदारी स्वीकारली, ती कौतुकास्पद आहे़
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

चव्हाणांना अभिवादन
कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऐतिहासिक विजय मिळविला, त्यानंतर त्यांची विजयी मिरवणूक निघाली ती शहराच्या मुख्य मार्गावरून थेट महाराष्ट्राचे पहिले दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी पोहोचली़ तेथे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्मृतिस्थळाला अभिवादन केले़

सत्तेच्या कवचकुंडलामुळे माजी मुख्यमंत्र्यांना यश : पाटील
कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात मी अपक्ष उमेदवार म्हणून कडवी लढत दिली. माजी मुख्यमंत्र्यांनी विकासापेक्षा पैशाचा प्रचंड वापर आणि सत्तेची कवचकुंडले घेऊन यश मिळविले आहे.
- विलासराव पाटील-उंडाळकर

Web Title: Pushing indelkar; South of earth 'raj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.