पुरुषोत्तम जाधव स्वगृही परतणार?
By Admin | Updated: June 13, 2016 00:19 IST2016-06-12T21:37:48+5:302016-06-13T00:19:25+5:30
कार्यकर्ते प्रतीक्षेत : सेनेचं वादळ झंझावात करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न

पुरुषोत्तम जाधव स्वगृही परतणार?
खंडाळा : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील प्रस्थापितांचा बालेकिल्ला मानला जात असला तरी कडवट शिवसैनिकांची मजबूत फळीही तितकीच सक्षम असल्याने शिवसेनेने आपले अस्तित्व अबाधित ठेवले आहे. वास्तविक शिवसेनेला जिल्ह्यात गावोगावी पोहोचविणारे आणि निस्वार्थीपणे कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्ष मजबूत करणारे जिल्ह्याचे नेते पुरुषोत्तम जाधव हे सध्या सेनेच्या बाहेर आहेत. पुढील राजकारणाची दिशा जिल्ह्याला भगवामय करण्यासाठी सेना अधिक प्रबळ होणे गरजेचे आहे. त्यासाठी सेनेचं वादळ झंझावात करण्यासाठी पुरुषोत्तम जाधव यांनी स्वगृही परतावे, अशी आर्त हाक शिवसैनिकांमधून दिली जात आहे. सध्या जिल्ह्यात होणारी ही चर्चा पुरुषोत्तम जाधव पुन्हा सेनेच्या मार्गावर असल्याचे मानले जात आहे.
लोकसभा निवडणूक अपक्ष लढविल्यानंतर स्वाभिमान जागृत ठेवत दोन वर्षांपूर्वी भाजपाची वाट धरणाऱ्या पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्व कौशल्याची म्हणावी तशी दखल भाजपातही घेतली गेली नाही. तरीही जनसंपर्क कायम राहिल्याने कार्यकर्त्यांचे मोहोळ आजही बरोबर राहिले आहे. मूळच्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी पुरुषोत्तम जाधव तुम्ही फिरा ! अशा प्रकारचे मेसेज सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत.
वास्तविक एका सामान्य कुटुंबातून येऊन जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी ठसा उमटविल्याने सर्वसामान्य नेतृत्व म्हणून जाधवांकडे पाहिले जाते. शिवसैनिकांची आर्त हाक असली तरी सेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना जाधव पुन्हा सेनेत आल्याचे चालणार का? याविषयी सध्या चर्चा आहेत. मात्र, जाधवांच्या एन्ट्रीने शिवसेनेत पुन्हा चैतन्य येईल ही सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे.
पुरुषोत्तम जाधव यांना पुन्हा सेनेत घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते. मात्र, त्यांना योग्य पद देऊन तोच सन्मान राखला जाणार का याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. याविषयी जाधवांशी संपर्क साधला असता योग्यवेळी निर्णय घेऊ, अशी सूचक प्रतिक्रिया मिळाली. मात्र, ती योग्य वेळ कधी हे पाहणे उत्सुकतेचे आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपूर्वी हा निर्णय झाल्यास शिवसेनेची ताकद वाढणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष जाधवांच्या भूमिकेकडे आहे. (प्रतिनिधी)
खासगीत बैठक
भाजपामधून विधानसभा लढविणारे पुरुषोत्तम जाधव यांना शिवसेनेत घेण्याबाबत गतीने हालचाल सुरू आहेत. याबाबत शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील व पुरुषोत्तम जाधव यांची खासगीत बैठक झाली असल्याची चर्चा आहे.