पंजाब, गुजरातचे पोलीस वाईत दाखल तीन तालुक्यांत यंत्रणा सज्ज :
By Admin | Updated: October 14, 2014 23:21 IST2014-10-14T22:30:14+5:302014-10-14T23:21:42+5:30
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम १७ गावांत बोटीने पोहोचले निवडणूक कर्मचारी

पंजाब, गुजरातचे पोलीस वाईत दाखल तीन तालुक्यांत यंत्रणा सज्ज :
संजीव वरे - वाई मागील विधानसभा निवडणुकीपासून पुनर्रचना झालेला वाई-महाबळेश्वर-खंडाळा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. येथील मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, कायदा-सुव्यवस्था राखणे आणि आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी घेण्यासाठी परिपूर्ण कार्यवाही करण्यात आली आहे. राज्यातील पोलीस दलांबरोबरच पंजाब आणि गुजरातचे पोलीस वाईत डेरेदाखल झाले आहेत. वाई मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विशेष सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्यासाठी वाई तालुक्यात १८४, खंडाळ््यात १३१, तर महाबळेश्वर तालुक्यात १२४ पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत. सीमा सुरक्षा दलाची एक तुकडी, पंजाब पोलीस दलाचे पाच अधिकारी आणि एक तुकडी, गुजरात पोलिसांची एक तुकडी आणि नानवीज (नाशिक) येथील एका तुकडीला पाचारण करण्यात आले आहे. कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक त्याच्या मतदारसंघात होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. सातारच्या पोलीस मुख्यालयातून चार विशेष पोलीस अधिकारी, वाईचे उपविभागीय अधिकारी दीपक डुंबरे, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे तसेच निवडणूक अधिकारी व उपविभागीय अधिकारी रवींद्र खेबुडकर, तीनही तालुक्यांचे तहसीलदार व त्या कार्यालयातील कर्मचारी निवडणुकीसाठी कार्यरत आहेत. मतदानयंत्रांची ने-आण करण्यासाठी एसटीबरोबरच खासगी गाड्यांचा वापर करण्यात येत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये कोयना जलाशयातून लाँचने मतदानयंत्रे नेण्यात आली आहेत. तीन स्थिर पथके, तीन फिरती पथके, तीन व्हिडिओ चित्रीकरण करणारी पथके अशी एकंदर नऊ पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांत दोन हत्यारबंद पोलिसांचा समावेश आहे. ढाबे, हॉटेल, वाहने यांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. सव्वातीन लाख मतदारांसाठी ४४० मतदानकेंद्रे या मतदारसंघात यावर्षीचे एकूण मतदान ३ लाख १२ हजार ४५६ एवढे असून, त्यात वाई तालुक्यातील १ लाख ५६ हजार ४९४, खंडाळा तालुक्यातील १ लाख ०४ हजार २६५ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ५१ हजार ६९७ मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी एकंदर ४४० मतदानकेंद्रे उभारण्यात आली आहेत. वाई तालुक्यात ७७ हजार ९९१ स्त्रिया तर ७९ हजार १०३ पुरूष मतदार आहेत. खंडाळ्यात ४९ हजार ९७८ स्त्रिया तर ५४ हजार २८७ पुरुष मतदार आहेत. महाबळेश्वर तालुक्यात २५ हजार ९०७ स्त्रिया आणि २५ हजार ९७० पुरुष मतदार आहेत.